IPL 2023, Chennai Super Kings vs Gujarat Titans Live : ऋतुराज गायकवाडच्या दमदार खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सने १७८ धावा उभ्या केल्या. त्याला अन्य सहकाऱ्यांची साथ मिळाली असती तर गुजरात टायटन्ससमोर आणखी तगडे आव्हान ठेवता आले असते. फलंदाजी झाल्यानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनीने Impact Player चा वापर करताना मराठी माणसावर विश्वास दाखवला.
इंडियन प्रीमिअर लीग २०२३ च्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सच्या ऋतुराज गायकवाडने( Ruturaj Gaikwad) पैसा वसूल खेळ केला. त्याने ५० चेंडूंत ४ चौकार व ९ षटकारांसह ९२ धावांची खेळी करताना चेन्नईला मजबूत स्थितीत आणले. ऋतुराजनंतर मोईन अली ( २३), शिवम दुबे ( १९), महेंद्रसिंग धोनी ( १४*) आणि अंबाती रायुडू ( १२) हे चेन्नईकडून सर्वाधिक धावा करणारे फलंदाज ठरले. ऋतुराजला रन आऊट करण्याची सोपी संधी शुबमन गिलने गमावली अन् तिच गुजरातला महागात पडली. ऋतुराजला आणखी चांगली साथ मिळाली असती तर चेन्नईने दोनशेपार धावा केल्या असत्या, परंतु तसं झालं नाही.
गुजरातच्या राशीद खान ( २-२६), मोहम्मद शमी ( २-२९) व अल्झारी जोसेफ ( २-३३) यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेत चेन्नईच्या धावांना लगाम लावला. धोनीने अखेरच्या षटकात चांगले फटके मारले अन् चेन्नईने ७ बाद १७८ धावा केल्या. धोनी ७ चेंडूंत १४ धावांवर नाबाद राहिला. धोनीने अंबाती रायुडूच्या जागी गोलंदाज तुषार देशपांडे ( Tushar Deshpande) याला इम्पॅक्ट खेळाडू म्हणून मैदानावर उतरवले. त्याच्या पहिल्याच चेंडूवर वृद्धीमान साहाचा झेल उडालाच होता, परंतु शिवम दुबेच्या हातापासून तो दूर राहिला. साहा व शुबमन गिल यांनी तुषारच्या पहिल्या षटकात १५ धावा चोपल्या.
चेन्नईचे राखीव खेळाडू - अजिंक्य रहाणे, तुषार देशपांडे, सुभ्रांषू सेनापती, शेख राशीद, निशांक सिंधू
गुजरातचे राखीव खेळाडू - बी साई सुधारन, जयंत यादव, मोहीत शर्मा, अभिनव मनोहर, केएस भरत
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"