IPL 2023, Chennai Super Kings vs Punjab Kings Live Marathi : महेंद्रसिंग धोनीच्या कल्पन नेतृत्व अन् डावपेचाने आजचा सामना पंजाब किंग्सच्या चांगला लक्षात राहिल... फॉर्मात असलेल्या अजिंक्य रहाणेला ( Ajinkya Rahane) डग आऊटमध्ये बसवून धोनीने चेन्नई सुपर किंग्सच्या डावखुऱ्या फलंदाजांना पुढे पाठवले अन् त्यामुळे PBKS समोर धावांचा डोंगर उभा राहिला. पंजाबच्या गोलंदाजांच्या शैलीचा अभ्यास करून माहीने हे निर्णय घेतले आणि ते यशस्वी ठरले. डेव्हॉन कॉनवे ( Devon Conway)ने सलग पाचव्यांदा ५०+ धावांची खेळी करून अनेक विक्रम मोडले अन् CSKला मोठी धावसंख्या उभारून दिली.
अजिंक्य तू थांब, त्यांना फलंदाजीला जाऊ दे! MS Dhoniचे दोन मास्टर स्ट्रोक, 'गब्बर' चक्रावला
धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ऋतुराज गायकवाड व डेव्हॉन कॉनवे या जोडीने पहिल्या विकेटसाठी ८६ धावांची भागीदारी केली. त्यांनी PBKS च्या जलदगती गोलंदाजांना पॉवर प्लेमध्ये सेट होऊ दिले नाही. सिकंदर रझाने PBKSला पहिले यश मिळवून देताना ऋतुराजला यष्टिचीत केले. त्याने ३१ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारांसह ३७ धावा केल्या. धोनीने आज तिसऱ्या क्रमांकावर डावखुऱ्या शिवम दुबेला ( Shivam Dube) पाठवले.
त्याने डेव्हॉनसह २६ चेंडूंत ४४ धावा जोडल्या. डोईजड झालेल्या शिवमला १४व्या षटकात अर्शदीपने माघारी पाठवले. शिवमने १७ चेंडूंत १ चौकार व २ षटकारांसह २८ धावा कुटल्या. त्यानंतर मोईन अली ( १०) व रवींद्र जडेजा हे डावखुरे फलंदाजच मैदानावर आले. अजिंक्य डग आऊटमध्ये बसून राहिला. डेव्हॉनने यंदाच्या आयपीएलमध्ये ४०० धावांचा टप्पा ओलांडला आणि फॅफ ड्यू प्लेसिसच्या लिस्टमध्ये पोहोचला. १८ व १९व्या षटकात पंजाबच्या गोलंदाजांनी चांगला मारा केला अन् डेव्हॉनला शतकापासून दूर ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.
डेव्हॉन ९१ धावांवर होता आणि त्याच्यासाठी शतक पूर्ण करण्यासाठी एकच षटक होते. पण, रवींद्र जडेजा स्ट्राईकवर होता. जडेजा ( १२) पहिल्याच चेंडूवर झेलबाद झाला... धोनी मैदानावर येताच स्टेडियम दणाणून गेले. त्याने तिसऱ्या चेंडूवर १ धाव घेत डेव्हॉनला स्ट्राईक दिली. सॅम करनचा स्लोव्ह चेंडू डेव्हॉनने पूल केला, परंतु लिएम लिव्हिंगस्टोनने तो तितक्याच अप्रतिम पद्धतीने पकडला. हा झेल आहे की नाही याबाबत तोच संभ्रमात असल्याने तिसऱ्या अम्पायरची मदत घेतली गेली. डेव्हॉन नॉट आऊट असल्याचा निर्णय आला अन् जल्लोष झाला. डेव्हॉनने ५२ चेंडूंत १६ चौकार व १ षटकारासह नाबाद ९२ धावा केल्या. धोनीने अखेरच्या दोन चेंडूवर षटकार खेचून चेन्नईला ४ बाद २०० धावांपर्यंत पोहोचवले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: IPL 2023, CSK vs PBKS Live Marathi : MS Dhoni smashed a six in last two ball, Devon Conway not out on 92 runs, Chennai Super kings 200/4
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.