IPL 2023, Chennai Super Kings vs Rajasthan Royals Live Marathi : राजस्थान रॉयल्सने जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवरील आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्येची आज नोंद केली. RR ने यापूर्वी १० वेळा २००+ धावा केल्या आणि एकही हार त्यांनी पत्करलेली नाही आणि आजही तेच झाले. कर्णधार संजू सॅमसनने आजच्या सामन्यात ट्रेंट बोल्टला बसवून अॅडम झम्पाला खेळवण्याचा निर्णय योग्य ठरला. झम्पाने तीन विकेट्स घेतल्या, तर आर अश्विननेही दोन बळी टिपले. अखेरच्या षटकापर्यंत MS Dhoni फलंदाजीला येईल अशी अपेक्षा चाहत्यांना होती, परंतु त्यांचे स्वप्न अपूर्ण राहिले. राजस्थान रॉयल्सने हा सामना जिंकून गुणसंख्या १० वर नेली.
जयपूरच्या हवेतच काहीतरी आहे; MS Dhoni चा संयम सुटतोच सुटतो, आजही त्याचा पारा चढला
ट्रेंट बोल्टच्या अनुपस्थितीतही RRच्या गोलंदाजांनी पॉवर प्लेमध्ये चांगला मारा केला. डेव्हॉन कॉनवे व ऋतुराज गायकवाड या फॉर्मात असलेल्या फलंदाजांना मोठा फटका मारता येत नव्हता. सहाव्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर कॉनवेने ( ८) फटका मारला, परंतु तो संदीप शर्माच्या हाती विसावला. अॅडम झम्पाने ही विकेट मिळवून दिली. ऋतुराजने २९ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ४७ धावा केल्या. झम्पाने ही विकेट मिळवून दिली. आर अश्विन आणि अजिंक्य रहाणे यांच्यात आज पुन्हा RRच्या गोलंदाजाने बाजी मारली. अश्विनने सहाव्यांदा अजिंक्यची ( १५) विकेट घेताना CSKला अडचणीत आणले. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेला अंबाती रायुडू ( ०) अश्विनच्या त्याच षटकात झेलबाद झाला.
मोईन अली आणि शिवम दुबे यांनी CSKच्या डावाला हळुहळू आकार देण्यास सुरूवात केली. युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर अलीने ६,४ खेचले. पुढे अश्विनच्या सलग दोन चेंडूंवर दुबेने उत्तुंग षटकार खेचले CSKच्या चाहत्यांसाठी वातावरण निर्मिती केली. अली व दुबे यांची ५१ धावांची भागीदारी झम्पाने मोडली आणि त्याने अलीला ( २३ ) गुगलीवर झेलबाद केले. चेन्नईला ३० चेंडूंत विजयासाठी ७८ धावा करायच्या होत्या. दुबे चांगली फटकेबाजी करत होता आणि त्याने २९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. १२ चेंडूंत ४८ धावा CSK ला करायच्या होत्या आणि दुबेवर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. जेसन होल्डरने १९व्या षटकात उत्तम मारा केला आणि ९ धावा दिल्या. ६ चेंडू ३७ असे अशक्य आव्हान CSK समोर आले. चेन्नईला 6 बाद 170 धावा करता आल्या. दुबे 52 धावांवर अखेरच्या चेंडूवर झेलबाद झाला.
तत्पूर्वी, यशस्वी जैस्वालने ४३ चेंडूंत ८ चौकार व ४ षटकारांसह ७७ धावा केल्या आणि त्याने जॉस बटलरसह ( २७) पहिल्या विकेटसाठी ८६ धावा जोडल्या. संजू सॅमसन ( १७) आणि यशस्वी यांना तुषार देशपांडेने एकाच षटकात माघारी पाठवले अन् CSK ने डोकं वर काढले. RRच्या धावगतीला वेसण बांधण्यात CSKच्या गोलंदाजांना यश आले. देवदत्त पडिक्कल व ध्रुव जुरेल यांनी अखेरच्या षटकांत चांगली फटकेबाजी करताना २० चेंडूंत ४८ धावा जोडल्या. जुरेल १५ चेंडूंत ३४ धावांवर रन आऊट झाला. RRने ५ बाद २०२ धावांचा टप्पा गाठला. पडिक्कल १३ चेंडूंत २३ धावांवर नाबाद राहिला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"