IPL 2023, Delhi Capitals vs Chennai Super Kings Live Marathi : ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad ) आणि डेव्हॉन कॉनवे ( Devon Conway ) या सलामीवीरांनी आज सामना गाजवला. चेन्नई सुपर किंग्सच्या सलामीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी १४१ धावांची विक्रमी भागीदारी करून दिल्ली कॅपिटल्सला हतबल केले. त्यानंतर शिवम दुबेने यजमान DCचे धाबे दणाणून सोडले आणि CSKला मोठी धावसंख्या उभी करून दिली.
ऋतुराज आणि कॉनवे यांची यशस्वी भागीदारी हे CSKच्या यशाचं प्रमुख कारण आहे. ही दोघं सुरुवातीला सावध खेळ करून खेळपट्टीवर स्थिरावले आणि त्यानंतर दिल्लीच्या गोलंदाजांना चोपून काढले. यंदाच्या पर्वात पॉवर प्ले मध्ये सर्वात कमी ९ विकेट्स CSK ने गमावल्या आहे. ६ ते ९ षटकांत CSK डाव मंदावला होता, परंतु दहाव्या षटकात ऋतुराजने सलग दोन षटकार खेचले आणि त्यानंतर कुलदीपच्या षटकात सलग तीन षटकार खेचून अर्धशतक पूर्ण केले. कॉनवेनेही खणखणीत षटकार खेचून यंदाच्या पर्वातील सहावे अर्धशतक पूर्ण केले.
१५व्या षटकात चेतन सकारियाने दिल्लीला पहिले यश मिळवून देताना CSKच्या सलामीवीरांची १४१ धावांची भागीदारी तोडली. ऋतुराज ५० चेंडूंत ३ चौकार व ७ षटकारांसह ७९ धावांवर माघारी परतला. कॉनवेने आता गिअर बदलला अन् जोरदार फटकेबाजी केली. शिवम दुबेला आज वरच्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले अन् त्यानेही खणखणीत षटकार खेचला. सेट झालेला कॉनवे DCच्या गोलंदाजांना चांगलाच चोपत होता. कॉनवे व दुबे यांनी १७ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. गोलंदाजांच्या कामगिरीवर कर्णधार डेव्हिड वॉर्नर नाराज दिसला. पण, त्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले ते खलील अहमदने. शिवम ९ चेंडूंत २२ धावा ( ३ षटकार) करून माघारी परतला.
आयपीएलच्या काही महत्त्वाच्या बातम्या
६,६,१,१,६,६,६! ऋतुराज गायकवाडचे वादळी अर्धशतक, ७ चेंडूंत कुटल्या ३२ धावा, Video
डॅनी मॉरिसनने 'खुणवाखुणवी' करून MS Dhoni ला विचारला प्रश्न, जाणून घ्या कारण
अखेरची दोन षटकं खेळण्यासाठी MS Dhoni क्रिजवर आला अन् स्टेडियमवर माही माही नावाचा जयघोष झाला. मात्र, पुढच्याच षटकात एनरिच नॉर्खियाने CSK ला मोठा धक्का दिला. कॉनवे ५२ चेंडूंत ११ चौकार व ३ षटकारांसह ८७ धावांवर माघारी परतला. धोनी एकेक धाव घेऊन रवींद्र जडेजाला स्ट्राईक देत होता आणि जडेजाने ( २०*) दमदार खेळ केला. चेन्नईने २० षटकांत ३ बाद २२३ धावा केल्या.