Join us  

IPL 2023, DC vs GT Live : 'साई'कृपा! गुजरात टायटन्स सुसाट, २१ वर्षीय फलंदाज पडला भारी; दिल्लीचा दुसरा पराभव

IPL 2023, Delhi Capitals vs Gujarat Titans Live :  दिल्ली कॅपिटल्सला इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये घरच्या मैदानावरही अपयश आले आणि सलग दुसऱ्या पराभवाचा त्यांना सामना करावा लागला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2023 11:24 PM

Open in App

IPL 2023, Delhi Capitals vs Gujarat Titans Live :  दिल्ली कॅपिटल्सला इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये घरच्या मैदानावरही अपयश आले आणि सलग दुसऱ्या पराभवाचा त्यांना सामना करावा लागला. कॅपिटल्सचे मनोबल उंचावण्यासाठी दुखापतग्रस्त रिषभ पंत स्टेडियमवर उपस्थित होता, परंतु त्याने नुसती वातावरण निर्मिती झाली, खेळाडूंवर त्याचा सकारात्मक परिणाम जाणवला नाही. एनरिच नॉर्खियाची गोलंदाजी चांगली होत असूनही DC कर्णधार डेव्हिड वॉर्नरने त्याची दोन षटकं राखून ठेवली आणि त्याचा फायदा गुजरात टायटन्सच्या फलंदाजांनी उचलला. इम्पॅक्ट प्लेअर विजय शंकर आणि साई सुदर्शन यांनी GT चा सलग दुसरा विजय निश्चित केला. सुदर्शनने अर्धशतकी खेळी करून गुजरातला विजय मिळवून दिला.

वृद्धीमान साहा व शुबमन गिल यांनी आक्रमक सुरूवात केली. तिसऱ्या षटकात दिल्लीने अनुभवी गोलंदाज एनरिच नॉर्खियाला आणले आणि त्याने साहाचा ( १४) त्रिफळा उडवला. नॉर्खियाने त्याच्या दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर भन्नाट वेगाने चेंडू टाकून गिलचा ( १४) त्रिफळा उडवला. दिल्लीचा इम्पॅक्ट खेळाडू खलिल अहमदने गुजरातला तिसरा धक्का देताना हार्दिक पांड्याला ( ५) बाद केले.  यानंतर वॉर्नरने नॉर्खियाच्या ओव्हर बंद केल्या अन् अन्य गोलंदाजांना आणले. पण, विजय शंकर व साई सुदर्शन या जोडीने याचा फायदा उचलताना चौथ्या विकेटसाठी ५०+ धावांची भागीदारी करून दिल्लीच्या आशांना सुरूंग लावला. 

मिचेल मार्शने १४व्या षटकात गुजरातची चौथ्या विकेटसाठीची ५३ धावांची भागीदारी तोडली. विजय २९ धावांवर LBW झाला. दिल्लीने योग्य DRS घेतला. दिल्लीला येथे गुजरातच्या फलंदाजावर दडपण निर्माण करण्याची संधी होती, परंतु मुकेश कुमारच्या गोलंदाजीवर डेव्हिड मिलरने खणखणीत, दणदणीत दोन षटकार व एक चौकार खेचून गुजरातला तणावमुक्त केले. सुदर्शनने ४४ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. मिलरने १६ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह नाबाद ३१ धावा केल्या. सुदर्शनने ४८ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह नाबाद ६२ धावा केल्या. गुजरातने १८.१ षटकांत ४ बाद १६३ धावा करून ६ विकेट्स राखून सामना जिंकला.

  तत्पूर्वी, मोहम्मद शमीने सुरूवातीलाच पृथ्वी शॉ  ( ७) व मिचेल मार्श ( ४) यांना माघारी पाठवले. त्यानंतर अल्जारी जोसेफने सलग दोन चेंडूंवर डेव्हिड वॉर्नर (३७) व रायली रुसो ( ०) यांची विकेट घेतली. राशिद खानने फिरकीच्या तालावर दिल्लीच्या फलंदाजांना नाचवले. अभिषेक पोरेल ( २०),  सर्फराज खान ( ३०) व अमन खान ( ८) यांना माघारी पाठवले. राशिद ( ३-३१) आणि शमी ( ३-४१) यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. अक्षर पटेल खिंड लढवताना २२ चेंडूंत २ चौकार व ३ षटकार खेचून ३६ धावांवर माघारी परतला. दिल्लीने ८ बाद १६२ धावा केल्या.  

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :आयपीएल २०२३दिल्ली कॅपिटल्सगुजरात टायटन्स
Open in App