आयपीएलच्या १६ व्या हंगामातील सातवा सामना आज खेळवला जाणार आहे. या सामन्यामध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्सचे संघ आमने-सामने येणार आहेत. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. दरम्यान, चेन्नईविरुद्धच्या पहिल्या सामन्यात दिग्गज फलंदाज केन विल्यमसन हा दुखापतग्रस्त होऊन संपूर्ण आयपीएलमधून बाहेर झाल्याने गुजरात टायटन्सच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आता त्याच्या जागी गुजरातचा संघ कुणाला संधी देतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
दुसरीकडे हा सामना दिल्लीच्या संघासाठीही खूप खास ठरणार आहे. कारण कारला झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या रिषभ पंतच्या जागी दिल्लीच्या संघाचं नेतृत्व डेव्हिड वॉर्नर करताना दिसणार आहे. त्याच्या नेतृत्वात दिल्लीने या हंगामात केवळ एकच सामना खेळला आहे. त्या सामन्यात त्याने लखनौ सुपर जायंट्सकडून त्यांना ५० धावांनी पराभूत व्हावे लागले होते.
अशा परिस्थितीत दिल्लीचा संघ घरच्या मैदानावर गुजरातला पराभूत करून विजयाचं खातं उघडण्याच्या इराद्याने मैदातान उतरणार आहे. गुजरात टायटन्सचाही या हंगामातील हा दुसरा सामना आहे. या सामन्यात दिल्लीवर मात करून आपली विजयी घोडदौड कायम ठेवण्याचा गुजरातचा इरादा असेल.
गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्यासाठी आपला अंतिम ११ खेळाडूंचा संघ निवडणे एक कठीण आव्हान ठरणार आहे. पहिल्याच सामन्यात क्षेत्ररक्षण करताना गंभीर दुखापत झाल्याने केन विल्यमसन संपूर्ण हंगामासाठी संघाबाहेर झाला आहे. अशा परिस्थितीत हार्दिक पांड्यासमोर केन विल्यमसनला पर्याय शोधण्याचे आव्हान असेल. अशा परिस्थितीत विल्यमसनच्या जागी दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज डेव्हिल मिलर याचा संघात समावेश होऊ शकतो. मिलर पहिल्या सामन्यात खेळला नव्हता. तो ३ एप्रिल रोजीच संघात दाखल झाला आहे. त्यामुळे त्याला या सामन्यात संधी मिळू शकते.
संभाव्य संघ गुजरात टायटन्स - शुभमन गिल, ऋद्धिमान साहा, विजय शंकर, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, राहुल तेवटिया, रशिद खान, अल्झारी जेसेफ, जोश लिटिल, मोहम्मद शमी, आणि यश दयाल किंवा साई सुदर्शन. दिल्ली कॅपिटल्स - पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, सरफराज खान, रोवमन पॉवेल, अमन खान, अक्षर पटेल, कुलदीप यादव, चेतन सकारिया, एनरिख नॉर्खिया आणि खलिल अहमद किंवा मनिष पांडे.