IPL 2023, Delhi Capitals vs Lucknow Super Giants Live : कायले मायर्सचे वादळ, मार्क वूडचा भन्नाट मारा अन् रवी बिश्नोईची फिरकी... याच्या जोरावर लखनौ सुपर जायंट्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये दिल्ली कॅपिटल्सवर विजय मिळवला. मायर्सचा सोपा झेल सोडणं दिल्लीला महागात पडलं आणि त्याने धावाचा डोंगर उभा केला. मार्क वूडने तीन महत्त्वाच्या विकेट्स घेत लखनौला विजयी उंबरठ्यावर आणले अन् बिश्नोईच्या फिरकीने दिल्लीला नाचवले. विकेट पडल्याने दिल्लीच्या धावांचा वेग मंदावला अन् त्यामुळे निर्माण झालेलं चेंडू व धावांमधील अंतर भरून काढणे दिल्लीला झेपले नाही.
पृथ्वी शॉ तावात मारायला गेला अन् मार्क वूडने त्रिफळा उडवला, दिल्लीला सलग २ विकेट्सचा धक्का, Video
डेव्हिड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ यांनी आक्रमक सुरूवात केली. पण, मार्क वूडने पाचव्या षटकात सर्व समिकरण बिघडवलं. पृथ्वी शॉ ( १२) आणि मिचेल मार्श ( ०) यांना सलग चेंडूवर वूडने त्रिफळाचीत केले. वूडची हॅटट्रिक मात्र हुकली. तिसरा चेंडू नो बॉल ठरला अन् त्यानंतर फ्री हिटवर सर्फराज खान झेलबाद झाला. पण, नो बॉलमुळे ती विकेट मिळाली नाही. पण, पुढील षटकात वूडने याची भरपाई मिळवली. सर्फराजला अप्रतिम बाऊन्सरवर त्याने खेळण्यास भाग पाडले अन् गौथमने सीमारेषेवर अचूक झेल घेतला. वॉर्नर आणि रायले रूसो यांनी चांगली फटकेबाजी करताना दिल्लीला १० षटकांत ३ बाद ७५ धावा उभ्या करून दिल्या.
रवी बिश्नोईच्या गोलंदाजीवर स्वीप मारण्याच्या प्रयत्नात रुसो ( ३०) झेलबाद झाला. त्याच्यासाठी LBW ची अपील झाली, पण चेंडू बॅटच्या मागच्या बाजूला लागून मायर्सच्या हातात विसावला. बिश्नोईने पुढील षटकात रोव्हमन पॉवेलला ( १) गुगलीवर पायचीत केले. आता दिल्लीच्या विजयाच्या आशा अंधूक होत चालल्या होत्या. दिल्लीला ६ षटकांत जवळपास शंभर धावा हव्या होत्या. वॉर्नरने ५० धावा पूर्ण करण्यासाठी ४५ चेंडू खेळून काढले. बिश्नोईने ३१ धावांत २ विकेट्स घेतल्या. इम्पॅक्ट खेळाडू अमन खान ( ४) अपयशी ठरला. धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात वॉर्नर ५६ धावांवर बाद झाला. आवेश खानने ही विकेट मिळवून दिली. दिल्लीला ९ बाद १४३ धावा करता आल्या आणि लखनौने हा सामना ५० धावांनी जिंकला. मार्क वूडने १४ धावांत ५ विकेट्स घेतल्या.
तत्पूर्वी, लोकेश राहुलला ( ८) चेतन सकारियाने बाद केला. लखनौने कायले मायर्सची ( Kyle Mayers ) अनपेक्षित निवड करताना दिल्लीला बुचकळ्यात टाकले. दीपक हुडा ( १७) व मायर्स यांनी दुसऱ्या विकेटसाठी ४२ चेंडूंत ७९ धावांची भागीदारी केली. मायर्स ३८ चेंडूंत २ चौकार व ७ षटकारांसह ७३ धावांवर त्रिफळाचीत झाला. निकोलस पूरनने २१ चेंडूंत २ चौकार व ३ षटकारांसह ३६ धावा केल्या. लखनौने २० षटकांत ६ बाद १९३धावा केल्या. आयुष बदोनीने ७ चेंडूंत १८ चेंडू कुटल्या. अखेरच्या चेंडूवर लखनौने इम्पॅक्ट खेळाडू म्हणून उतरवलेल्या के गौथमने षटकार खेचला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"