आयपीएलमध्ये आज होत असलेल्या पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्सचे संघ आमने सामने येणार आहे. या सामन्यात दिल्लीचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएलमधील पहिल्या दोन सामन्यात पराभव पत्करावा लागल्याने आज राजस्थानवर मात करून विजयाचे खाते उघडण्याचे आव्हान दिल्ली कॅपिटल्ससमोर असणार आहे. तर पंजाब किंग्सकडून झालेल्या निसटत्या पराभवाची जखम विसरून पुन्हा एकदा विजयी ट्रॅकवर परतण्याचे आव्हान राजस्थानसमोर असेल.
दिल्लीने या सामन्यासाठी संघात तीन बदल केले आहेत. मनीष पांडे, ललित यादव आणि रोवमन पॉवेल यांना दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलं आहे. तर मिचेल मार्श, सर्फराज खान आणि अमन खान यांना वगळले आहे. पृथ्वी शॉ याला संघात स्थान देण्यात आलेले नाही. मात्र तो इम्पॅक्ट प्लेअर म्हणून दुसऱ्या डावात खेळू शकतो.
आयपीएलमधील आकडेवारीचा विचार केल्यास दोन्ही संघांनी एकमेकांविरुद्ध तुल्यबळ खेळ केलेला आहे. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्सचे संघ २६ वेळा आमने-सामने आले आहेत. त्यातील १३ सामन्यांमध्ये राजस्थान रॉयल्सने विजय मिळवला आहे. तर १३ सामन्यांमध्ये राजस्थान रॉयल्सने बाजी मारली आहे. त्यामुळे आजच्या लढतीत कोण बाजी मारेल याबाबत उत्सुकता असेल.
अंतिम संघ राजस्थान रॉयल्स - जोस बटलर (यष्टीरक्षक), यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार), ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, जेसन होल्डर, रविचंद्रन अश्विन, य़ुझवेंद्र चहल, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा. दिल्ली कॅपिटल्स - डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), मनीष पांडे, रिली रोसू, रोवमन पॉवेल, ललित यादव, अक्षर पटेल, अभिषेक पोरेल, खलील अहमद, कुलदीप यादव, मुकेश कुमार, ऑनरिख नॉर्खिया.