IPL 2023, Eliminator Mumbai Indians vs Lucknow Super Giants Live Marathi : मुंबई इंडियन्सला अवघ्या ३८ धावांत दोन धक्के बसले. लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार कृणाल पांड्या याने फिरकीपटूंनी मारा सुरू केला, परंतु रोहित शर्मा व इशान किशन यांनी त्यांना चोपले. त्यानंतर चौथ्या षटकात जलदगती गोलंदाज नवीन उल हकला गोलंदाजीला आणले. चेपॉकवर कोहली... कोहली... चा नारा घुमला... पण नवीनने MIचा कर्णधार रोहितला बाद केले अन् सर्व प्रेक्षक गप्प झाले. त्यानंतर पुढच्या षटकात यश ठाकूरने MIचा दुसरा सलामीवीर इशान किशनला बाद केले. यावेळी LSGचे मालक संजीव गोएंका खिशातून फोटो काढून देवाचे आभार मानताना दिसले.
चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल २०२३ च्या फायनलमध्ये प्रवेश करण्याचा पहिला मान पटकावला. आज एलिमिनेटर सामन्यात पाचवेळचा विजेता मुंबई इंडियन्स चेपॉकवर लखनौ सुपर जायंट्सला टक्कर देणार आहे. आजच्या सामन्यातील विजेता संघ क्वालिफायर २ मध्ये गतविजेत्या गुजरात टायटन्सला भिडेल. त्यानंतर आयपीएलचा दुसरा फायनलिस्ट मिळेल. मुंबई इंडियन्सचा स्पर्धेतील प्रवास काही खास झालेला नाही, परंतु दुसऱ्या टप्प्यात मिळवलेल्या विजयांमुळे आणि गुजरातच्या कृपेमुळे ते प्ले ऑफमध्ये पोहोचले. KL Rahul च्या माघारीनंतर कृणाल पांड्याने LSGची जबाबदारी सक्षमपणे सांभाळली आणि संघाला इथपर्यंत पोहोचवले. ( IPL 2023, Eliminator MI vs LSG Live scorboard मराठीतून )
MI ने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कुमार कार्तिकेयाच्या जागी आज प्लेइंग इलेव्हनमध्ये हृतिक शोकिन खेळणार आहे. लखनौविरुद्ध झालेल्या तीन सामन्यांत मुंबईला एकही विजय मिळवता आलेला नाही. कृणाल पांड्याने पहिले षटकत टाकले अन् इशान किशनने कटशॉट मारून चौकार खेचला. पण, दुसऱ्याच चेंडूवर त्याने मारलेला सरळ फटका झेल झाला असता, पण कृणाल चेंडूपर्यंत पोहचू शकला नाही. इशानने दुसऱ्या षटकातही कृष्णप्पा गौथमला दोन सुरेख चौकार खेचले.
रोहितने तिसऱ्या षटकात षटकाराने खातं उघडलं. इशानने दहावी धाव घेताच मुंबई इंडियन्सकडून २००० धावा पूर्ण केल्या. नवीन उल हक गोलंदाजीवर आल्यावर प्रेक्षकांनी कोहली... कोहली... नावाचा जयघोष सुरू केला. पण, त्याने रोहितला ( ११) बाद करून प्रेक्षकांना शांत केलं. नवीनने कानात बोटं घालून सेलिब्रेशन केलं अन् LSGचे मालक संजिव गोएंका यांनी पुन्हा खिशातून फोटो काढून प्रार्थना केली.