कोलकाता : नियमित कर्णधार श्रेयस अय्यरची दुखापत आणि बांगलादेशचा अष्टपैलू शाकिब अल हसन याच्या माघारीनंतर संघाला बळकटी देण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्सने (केकेआर) आयपीएलमध्ये २.८ कोटींत इंग्लंडला आक्रमक सलामीवीर जेसन रॉय याला आपल्या ताफ्यात दाखल करुन घेतले आहे. रॉय हा गुरुवारी आरसीबीविरुद्ध होणाऱ्या सामन्यात खेळू शकणार नाही. मात्र ९ एप्रिल रोजी गुजरात टायटन्सविरुद्ध होणाऱ्या लढतीसाठी उपलब्ध होणार आहे.रॉय हा अफगाणिस्तानचा यष्टिरक्षक-फलंदाज रहमनुल्लाह गुरबाज याचे स्थान घेण्याची शक्यता आहे. गुरबाजने पंजाब किंग्सविरुद्ध सलामीला खेळून १६ चेंडूंत २२ धावा केल्या होत्या. अय्यर पाठदुखीमुळे संपूर्ण सत्रातून बाहेर पडल्याने दोन वेळेचा चॅम्पियन केकेआरला धक्का बसला. शाकिबने वैयक्तिक कारणांमुळे माघार घेतली.
केकेआरने बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, केकेआरने टाटा आयपीएल २०२३ साठी इंग्लंडचा जेसन रॉय याला २.८ कोटींत संघात घेतले. रॉयची मूळ किंमत दीड कोटी होती. राॅय २०१७ ला पहिल्यांदा आयपीएलमध्ये गुजरात लायन्ससाठी आणि २०२१ ला सनरायजर्स हैदराबादसाठी खेळला होता. २०२१ ला पाच सामन्यात त्याने एका अर्धशतकासह १५० धावा केल्या. ३२ वर्षांचा हा खेळाडू इंग्लंडकडून ६४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळला. त्याने आठ अर्धशतकांसह १५२२ धावा काढल्या आहेत.