२०११ च्या वर्ल्ड कपमधला विजयी षटकार असो किंवा आयपीएल स्पर्धेतील एकापेक्षा एक 'मॅच विनिंग' खेळी; 'कॅप्टन कूल' महेंद्रसिंह धोनीनं सामन्याला दिलेला 'फिनिशिंग टच' किती भारी असतो, हे सगळ्यांनीच पाहिलंय. अखेरच्या षटकांमध्ये समोर धोनी असणं म्हणजे गोलंदाजांसाठी धडकीच. तो त्याच्या 'हेलिकॉप्टर शॉट'ने चेंडू कसा भिरकावून देईल याचा नेम नसतो. असं असूनही, चेन्नई सुपरकिंग्जमध्ये धोनीच्याच नेतृत्वाखाली खेळलेल्या एका माजी शिलेदारानं सर्वोत्तम 'फिनिशर' म्हणून 'माही'ऐवजी एका वेगळ्या क्रिकेटवीराचं नाव घेतलं आहे. आता तुम्हालाही प्रश्न पडलाय ना, धोनी नही तो कौन बे?
MS धोनीचा त्याग; सीएसकेच्या तीन खेळाडूंसाठी वरच्या क्रमांकावर फलंदाजीला येत नाही!
त्याचं झालं असं की, स्टार स्पोर्ट्सवरील "Ask Star" या शोमध्ये दक्षिण आफ्रिका संघातून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला आणि चेन्नईकडून आयपीएल गाजवलेला फिरकीपटू इम्रान ताहीर गप्पा मारायला आला होता. एका प्रेक्षकानं त्यालाच 'गुगली' टाकला. तुझ्या मते बेस्ट फिनिशर कोण?, धोनी की एबी डिविलियर्स?, हा प्रश्न ऐकून ताहीरसह संजय मांजरेकर आणि इरफान पठाणही हसू लागले. कारण, या दोघांमधून एकाची निवड करणं तसं अवघडच होतं. इम्रान ताहीर आपलं मत कुणाच्या पारड्यात टाकणार याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता होती.
"तुम्ही मला जरा अडचणीतच आणलंय, पण एबीडीपेक्षा चांगला फिनिशर माझ्या पाहण्यात नाही. मी त्याचीच निवड करेन. फिनिशिंग असो किंवा मग डावाला आकार देण्याची जबाबदारी पेलणं असो, माझ्या कारकिर्दीत त्याच्याइतका भारी खेळाडू मी पाहिलेला नाही", असं ताहीरनं अगदी ठामपणे सांगितलं.
'मिस्टर ३६०' म्हणून ओळखला जाणारा एबी डिविलियर्स 'डेंजर' फलंदाज होता. त्याने दक्षिण आफ्रिकेला अनेक सामने एकहाती जिंकवून दिले आहेतच, पण २०११ ते २०२१ अशी दहा वर्षं तो रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघाचा आधारस्तंभ होता. बेंगलोरला आयपीएल ट्रॉफी जिंकता आली नसली, तरी एबीडीच्या अनेक धडाकेबाज खेळींनी चाहत्यांना वेड लावलं होतं.
‘त्या खेळीमुळे भारतीय संघात स्थान पक्के झाले’; धोनी झाला भावुक
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या सात खेळाडूंमध्ये महेंद्रसिंह धोनी आणि डिविलियर्स हे दोघंही आहेत. त्यांच्या खात्यात ५ हजारहून अधिक धावा जमा आहेत.