IPL 2023 Final Gujarat Titans vs Chennai Super Kings Live marathi : महेंद्रसिंग धोनीने ( MS Dhoni) कारकीर्दितील अखेरच्या इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेत जेतेपदाचा चषक उंचावला. गुजरात टायटन्सने २१५ धावांचे तगडे लक्ष्य ठेवले होते, परंतु पावसाच्या व्यत्ययामुळे CSK समोर १५ षटकांत १७१ धावांचे सुधारित लक्ष्य ठेवले गेले. CSKच्या आघाडीच्या फलंदाजांनी सुरुवातही दणक्यात करून दिली, परंतु GTचे हुकमी एक्के नूर अहमद व मोहित शर्मा यांनी मॅच फिरवली होती. पण, धोनीला विक्रमी पाचवे जेतेपद जिंकून देण्यासाठी ते अपयशी ठरले. रवींद्र जडेजाने थरारक सामन्यात अखेरच्या दोन चेंडूंत 10 धावा चोपून विजय मिळवून दिला.
पावसाच्या व्यत्ययामुळे मध्यरात्री १२.१० वाजता दुसरा डाव सुरू झाला आणि आयपीएल इतिहासात प्रथमच फायनल सामना तिसऱ्या दिवसापर्यंत खेळली गेली. ऋतुराज गायकवाड व डेव्हॉन कॉनवे यांनी खणखणीत फटके खेचले. या दोघांनी ४ षटकांत ५२ धावा फलकावर चढवून आपला इरादा स्पष्ट केला. राशीद खानने टाकलेल्या चौथ्या षटकात ऋतुराजने मारलेला षटकार अविश्वसनीय होता. क्षेत्ररक्षण रुंदावल्यानंतर नूर अहमदने टाकलेल्या पाचव्या षटकात ६ धावाच मिळाल्या. पण, त्याची वसूली जॉश लिटलच्या षटकातून केली अन् चेन्नईने ६ षटकांत ७२ धावांची मजल मारली.
नूरने CSKला पहिला धक्का देताना ऋतुराजला २६ ( १६ चेंडू, ३ चौकार व १ षटकार) धावांवर झेलबाद झाला. नूर त्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर कॉनवेला ४७ ( २५ चेंडूंत ४ चौकार व २ षटकार) धावांवर बाद झाला. दोन्ही फलंदाज माघारी परतल्यानंतर CSKवर दडपण येईल असे वाटले होते, परंतु अजिंक्य रहाणेने ८व्या षटकात लिटलला दोन उत्तुंग षटकार खेचले. नूरने त्याच्या ३ षटकांत १७ धावांत २ विकेट्स घेतल्या. CSK ने १० षटकांत २ बाद ११२ धावा उभ्या केल्या आणि त्यांना ३० चेंडूंत ५९ धावा करायच्या होत्या. ( अजिंक्य रहाणेचे षटकार पाहा ) ११व्या षटकात मोहित शर्माने गतीमध्ये परिवर्तन करताना अजिंक्यला चुकीचा फटका खेळण्यास भाग पाडले. अजिंक्य १३ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह २७ धावांवर बाद झाला.
अजिंक्यच्या विकेटने CSKवरील दडपण वाढले, त्यात शिवम दुबेचा एकहा फटका बॅटवर चांगला बसत नव्हता. २४ चेंडूंत ५४ धावा असे गणित झाले होते. राशीद खानच्या तिसऱ्या षटकाचे शेवटचे दोन चेंडू शिवमने षटकार खेचून सामन्यात रंगत आणली. राशीदने ३ षटकांत ४४ धावा दिल्या. CSK ला १८ चेंडूंत ३९ धावा करायच्या होत्या. आयपीएल कारकीर्दितील शेवटची मॅच खेळणाऱ्या अंबाती रायुडूने १३व्या षटकात मोहित शर्माला ६,४,६ असे फटके खेचले. चौथ्या चेंडूवर मोहितने पलटवार केला अन् रायुडू ८ चेंडूंत १९ धावा करून माघारी परतला. MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बाद झाला. १२ चेंडूंत २१ धावांची गरज असताना CSKने ८ धावा मिळवल्या. आता ६ चेंडू १३ धावा अशी मॅच आली. 2 चेंडूंत 10 धावांची गरज असताना रवींद्र जडेजाने षटकार खेचला त्यानंतर चौकार खेचून CSKच्या खेळाडूंनी एकच जल्लोष केला. चेन्नईने 5 विकेट्सने सामना जिंकला. शिवम 31 धावांवर, तर जडेजा 16 धावांवर नाबाद राहिले.
तत्पूर्वी, गुजरातच्या फलंदाजांनी दमदार कामगिरी केली. साई सुदर्शनच्या ४७ चेंडूंत ८ चौकार व ६ षटकारांसह ९६ धावांनी मॅच फिरवली. वृद्धीमान साहाच्या ३९ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ५४ धावा आणि शुबमन गिलच्या ३९ धावांच्या जोरावर गुजरात टायटन्सने ४ बाद २१४ धावांचा डोंगर उभा केला. शुबमन व साहा यांनी पहिल्या विकेटसाठी ६७ धावा जोडल्यानंतर साई सुदर्शनने अविश्वसनीय खेळी केली. साहा आणि सुदर्शन यांनी ४२ चेंडूंत ६४ धावांची भागीदारी केली. साईने हार्दिक पांड्यासह ३३ चेंडूंत ८१ धावा झोडल्या. हार्दिक १२ चेंडूंत २१ धावांवर नाबाद राहिला.
Web Title: IPL 2023 Final GT vs CSK Live Marathi: Ravindra Jadeja hits 10 from the final two balls to win the 2023 IPL for CSK, MS DHONI HAS WON THE INDIAN PREMIER LEAGUE TITLE FIVE TIMES.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.