IPL 2023 Final Gujarat Titans vs Chennai Super Kings Live marathi : गुजरात टायटन्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२३ फायनलमध्ये दमदार कामगिरी केली. चेन्नई सुपर किंग्सने सोडलेले झेल, क्षेत्ररक्षणात दाखवलेला ढिसाळपणा गतविजेत्यांच्या पथ्यावर पडला. महेंद्रसिंग धोनीने ( MS Dhoni) चपळाईने फॉर्मात असलेल्या शुबमन गिलची विकेट मिळवली, परंतु वृद्धीमान साहा व साई सुदर्शन यांनी अर्धशतकं झळकावून CSKच्या गोलंदाजांची धुलाई केली आणि GT ने मोठी धावसंख्या उभी केली.
शुबमन गिलने GTला वृद्धीमान साहासह सावध सुरूवात करून देताना ६७ धावांची भागीदारी केली. तुषार देशपांडेच्या दुसऱ्या षटकात शुबमनचा ( ३) स्क्वेअर लेगला दीपक चहरने सोपा झेल टाकला. त्यानंतर शुबमनने गिअर बदलला अन् चौकारांची रांग लावली.. साहानेही हात साफ करून घेताना चौकार-षटकार खेचले. आज सर्व काही गुजरातच्या बाजूने घडत असताना ७व्या षटकाचा अखेरचा चेंडू रवींद्र जडेजाने वेगाने फेकला अन् गिलच्या बॅटीच्या जवळून गेला. महेंद्रसिंग धोनीने तितक्याच चपळतेनं बेल्स उडवल्या अन् अम्पायरकडे पाहत तो जडेजाला हात मिळवण्यासाठी पुढे गेला. मोठ्या स्क्रीनवर जेव्हा धोनीची ही चपळता पाहायला मिळाला तेव्हा एकच जल्लोष झाला, कारण गिलला ३९ धावांवर यष्टिचीत होऊन माघारी परतावे लागले. ( पाहा महेंद्रसिंग धोनीची चपळ स्टम्पिंग )
गिल बाद झाल्यानंतरही गुजरातच्या धावा काही आटताना दिसल्या नाही... CSKचा संघ गिलचा अभ्यास करून आले होते अन् आज साहाचा पेपर समोर आला. साहाने चांगले फटके मारले अन् त्याला साई सुदर्शनने संयमी खेळी करून साथ दिली. साहाने ३६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. साहा आणि सुदर्शन यांनी ४२ चेंडूंत ६४ धावांची भागीदारी केली. दीपक चहरने ही जोडी तोडली. साहाने मारलेला चेंडू जागच्याजागी हवेत उडाला अन् धोनीने तो सहज टिपला. साहा ३९ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ५४ धावांवर बाद झाला. १५ षटकांत गुजरातच्या २ बाद १४३ धावा झाल्या होत्या आणि आता शेवटच्या ५ षटकांत चौकार-षटकारांची आतषबाजी अपेक्षित होती. सुदर्शननेही ३३ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. तो अगदी सहजतेने गॅपमध्ये चेंडू मारून चौकार मिळवताना दिसला. ( IPL 2023 Final GT vs CSK Live Scoreboard Marathi )
चपळ माही! रवींद्र जडेजाचा चेंडू सर्रर्रर्र...कन गेला; MS Dhoni ने शुबमन गिलचा दांडा उडवला, Video
साई सुदर्शन आज CSKच्या गोलंदाजाना भिक घालत नव्हता अन् चौकारांमागून चौकार खेचताना दिसला. तुषारने टाकलेल्या १७व्या षटकात सुदर्शनने ६,४,४,४,१,१ अशा १८ धावा चोपून काढल्या. त्यानंतर हार्दिक पांड्यानेही हात मोकळे केले. २०व्या षटकात सुदर्शनने दोन सलग षटकार खेचले, परंतु तिसऱ्या चेंडूवर पथिराणाने त्याला पायचीत केले. सुदर्शन ४७ चेंडूंत ८ चौकार व ६ षटकारांसह ९६ धावांवर बाद झाला. गुजरातने 4 बाद 214 धावांचा डोंगर उभा केला.