Join us  

IPL 2023 : IPLचा पहिला आठवडा आटोपला, ऑरेंज आणि पर्पल कॅपच्या शर्यतीत कोण पुढे, पाहा संपूर्ण लिस्ट

IPL 2023: आयपीएलच्या प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी सर्व १० संघांमध्ये चढाओढ दिसून येत आहे. तर फलंदांज आणि गोलंदाजांमध्ये ऑरेंज आणि पर्पल कॅपसाठी शर्यत दिसून येत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2023 2:20 PM

Open in App

आयपीएलच्या सोळाव्या हंगामाला सुरुवात होऊन आता एक आठवडा उलटत आला आहे. यादरम्यान, काही रंगतदार सामने क्रिकेटप्रेमींना पाहायला मिळाले आहेत. आयपीएलच्या प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी सर्व १० संघांमध्ये चढाओढ दिसून येत आहे. तर फलंदांज आणि गोलंदाजांमध्ये ऑरेंज आणि पर्पल कॅपसाठी शर्यत दिसून येत आहे. दरम्यान, पहिल्या आठवड्यानंतर ऑरेंज कॅपच्या शर्यतीत चेन्नई सुपरकिंग्सचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड याने आघाडी घेतली आहे. तर पर्पल कॅपच्या शर्यतीत सध्या राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर युझवेंद्र चहल आघाडीवर आहे.

ऑरेंज कॅपच्या शर्यतीत अव्वलस्थानी असलेल्या चेन्नई सुपर किंग्सच्या ऋतुराज गायकवाडने तीन सामन्यांमध्ये दोन अर्धशतकांसह १८९ धावा काढल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या ९२ होती. तर दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने तीन सामन्यात दोन अर्धशतकांसह १५८ धावा काढल्या आहेत. राजस्थान रॉयल्सचा जोस बटलर या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहेत त्याने तीन सामन्यात १५२ धावा काढल्या आहेत. लखनौ सुपरजायंट्सचा कायल मायर्स या यादीमध्ये चौथ्या स्थानी आहे. त्याने तीन सामन्यांमध्ये १३९ धाव काढल्या आहेत. तर पंजाब किंग्सचा कर्णधार शिखर धवन या यादीमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. त्याने दोन सामन्यात १२६ धावा काढल्या आहेत. 

पर्पल कॅपचा विचार केल्यास या क्रमवारीत राजस्थान रॉयल्सच्या युझवेंद्र चहलने अव्वल स्थान पटकावलं आहे. त्याने तीन सामन्यांमध्ये आठ विकेट्स टिपले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर लखनौ सुपरजायंट्सचा मार्क वूड आहे. त्याने दोन सामन्यात आठ विकेट्स काढल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर लखनौ सुपर जायंट्सचा रवी बिश्नोई आहे. त्याने तीन सामन्यात सहा बळी घेतले आहेत. कोलकाता नाईटरायडर्सचा वरुण चक्रवर्ती या क्रमवारी चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने दोन सामन्यात ५ विकेट्स मिळवल्या आहेत. तर पाचव्या क्रमांकावर असलेल्या गुजरात टायटन्सच्या रशिद खानने दोन सामन्यांत पाच विकेट्स काढल्या आहेत.

दुसरीकडे आयपीएलच्या गुणतालिकेमध्ये सध्या राजस्थान रॉयल्सचा संघ तीन सामन्यात दोन विजयांसह अव्वलस्थानी आहे. तर लखनौ सुपरजायंट्सचा संघ तीन सामन्यांत दोन विजयांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. गुजरात टायटन्सचा संघ दोन सामन्यांमधील दोन विजयांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नई सुपरकिंग्सने मुंबईवर मिळवलेल्या विजयानंतर मोठी झेप घेत चौथे स्थान पटकावले आहे. तर पंजाब किंग्सचा संघ दोन सामन्यांत दोन विजयांसह पाचव्या क्रमांकावर आहे. तर कोलकाता नाईटरायडर्स सहाव्या, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सातव्या स्थानी आहेत. तर स्पर्धेत आतापर्यंत एकही सामना न जिंकलेला मुंबई इंडियन्स आठव्या, दिल्ली कॅपिटल्स नवव्या आणि सनरायडझर्स हैदराबाद दहाव्या क्रमांकावर आहे. 

टॅग्स :आयपीएल २०२३ऋतुराज गायकवाडयुजवेंद्र चहल
Open in App