IPL 2023 : चेन्नई सुपर किंग्सला इंडियन प्रीमिअर लीग २०२३ च्या पहिल्याच सामन्यात गतविजेत्या गुजरात टायटन्सकडून पाच विकेट्सने पराभव पत्करावा लागला. आयपीएलमधील हा त्यांचा सलग चौथा आणि गुजरात टायटन्सविरुद्धचा तिसरा पराभव ठरला. या सामन्यानंतर भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग ( Virender Sehwag) याने महेंद्रसिंग धोनीच्या कर्णधार कौशल्यावर टीका केली. धोनीच्या काही निर्णयाने अचंबित झाल्याचे वीरूने सांगितले. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानावर उतरवलेल्या तुषार देशपांडेवरही वीरू नाखूश दिसला. अंबाती रायुडूच्या जागी तुषारला धोनीने दुसऱ्या डावात मैदानावर उतरवले होते.
''महेंद्रसिंग धोनीने मधल्या काही षटकांत मोईन अलीला गोलंदाजीला आणायला हवे होते. त्याला तुषार देशपांडेची गरज पडली नसती, ज्याने सामन्यात सर्वाधिक धावा दिल्या. धोनीकडून अशा चूका अपेक्षित नाहीत. उजव्या हाताचा फलंदाज मैदानावर असताना ऑफ स्पिनरला गोलंदाजीला आणून धोका पत्करायला हवा होता आणि त्यातून काहीतरी साध्य करण्याचा अप्रोच ठेवायला हवा होता,''असे वीरू म्हणाले. तुषारने या सामन्यात ४ षटकांत ५१ धावा दिल्या आणि त्याने शुबमन गिलची महत्त्वाची विकेट घेतली. मोईन अलीला या सामन्यात एकही षटक दिले गेले नाही.
भारताचा फलंदाज मनोज तिवारी यानेही तुषारच्या निवडीवर आश्चर्य व्यक्त केले. तो म्हणाला,''इम्पॅक्ट खेळाडू तुषार देशपांडेला नवीन चेंडूवर गोलंदाजी देण्याच्या निर्णयाचे मलाही आश्चर्य वाटले. त्यांनी राजवर्धन हंगरगेकरला नवीन चेंडूवर गोलंदाजी करायला द्यायला हवी होती.'' चेन्नई सुपर किंग्सचा पुढील सामना ३ एप्रिलला लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध चेपॉकवर होणार आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: IPL 2023 : former India cricketer Virender Sehwag lashed out at MS Dhoni for his poor captaincy against GT match
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.