MS Dhoni CSK, IPL 2023: स्पर्धेतील काही सामने होऊन गेल्यानंतर चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघासाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. चेन्नई सुपर किंग्ज (CSK) शुक्रवारी चेन्नईच्या चेपॉक मैदानावर सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध आयपीएल सामना खेळणार आहे. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज (CSK) च्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सर्वात धमाकेदार खेळाडूची एन्ट्री होऊ शकते.
पायाच्या दुखापतीमुळे गेल्या तीन सामन्यांना CSKचा एक अतिशय मोठा आणि महत्त्वाचा खेळाडू मुकला होता, पण अखेर आता बेन स्टोक्स तंदुरुस्त झाला आहे आणि संघ निवडीसाठी उपलब्ध असल्याचे स्पष्ट झाले आहे. चेन्नईसाठी ही नक्कीच दिलासादायक बाब आहे. बुधवारी बेन स्टोक्सनेही सराव सत्रात भाग घेतला त्यामुळे चेन्नईची ताकद आता अजूनच वाढली असल्याचे बोलले जात आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर (आरसीबी) संघर्षपूर्ण विजय नोंदवल्यानंतर चेन्नईचा संघ आपल्या घरच्या मैदानावर परतत आहे आणि अशा परिस्थितीत बेन स्टोक्सच्या पुनरागमनामुळे त्यांना आणखी बळ मिळेल. त्याचा प्रतिस्पर्धी सनरायझर्सला गेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून पराभव स्वीकारावा लागला होता. डेव्हॉन कॉनवे आणि ऋतुराज गायकवाड या सलामीच्या जोडीने आणि शिवम दुबेच्या आक्रमक खेळीच्या जोरावर चेन्नईने अखेरच्या सामन्यात मोठी धावसंख्या उभारली होती. तसेच अजिंक्य रहाणे ज्याप्रकारची धडाकेबाज फलंदाजी करत आहे, त्यामुळे चेन्नईला बळ मिळाले आहे.
चेन्नईचे आघाडीचे फलंदाज फार चांगली कामगिरी करताना दिसत आहेत, पण त्यांचे गोलंदाज प्रतिस्पर्धी संघाच्या धावांचा ओघ रोखण्यात अपयशी ठरले आहेत. चेन्नईचे क्षेत्ररक्षणही यंदा फारसे चांगले राहिले नाही. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मथिशा पाथिरानाने आरसीबी विरुद्ध प्रभावी कामगिरी केली, परंतु इतर गोलंदाजांबाबत असे म्हणता येणार नाही. तुषार देशपांडेची कामगिरी प्रत्येक सामन्यानंतर सुधारत असली तरी, चेन्नईला सनरायझर्सच्या फलंदाजांना लगाम लावायचा असेल तर महेश तिक्ष्णा, रवींद्र जडेजा आणि मोईन अली या तिन्ही फिरकीपटूंना चांगली कामगिरी करावी लागेल.