Join us  

IPL 2023, GT vs DC Live : दिल्ली कॅपिटल्सचा थरारक विजय, गुजरात टायटन्सला १३० धावा करण्यापासून रोखले

IPL 2023, Gujarat Titans vs Delhi Capitals Live Marathi : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये आणखी एक सामना चुरशीचा झाला..

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2023 11:10 PM

Open in App

IPL 2023, Gujarat Titans vs Delhi Capitals Live Marathi : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये आणखी एक सामना चुरशीचा झाला.. १३१ धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सच्या फलंदाजांना संघर्ष करावा लागला. दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांनाही मोहम्मद शमीने ( ४-११) धक्के दिले.. अमन खानच्या अर्धशतकाने DC ने ५ बाद २३ वरून सन्मानजनक धावसंख्या उभी केली. हार्दिक पांड्याने एकहाती खिंड लढवताना GTला विजयाच्या उंबरठ्यावर आणले अन् त्यात राहुल तेवातियाने सलग ३ षटकार खेचून DCकडून मॅच खेचून नेली. पण, अनुभवी इशांत शर्माने २०व्या षटकात तेवातियाला बाद केले. इशांतने दिल्लीच्या हातून गेलेली मॅच पुन्हा मिळवून दिली. 

श्रेयसचा सोबती अमन खान चमकला; दुर्घटनेमुळे जलदगती गोलंदाजाचा फलंदाज बनला!

मोहम्मद शमीने ( Mohammed Shami) भेदक मारा करताना ११ धावांत ४ फलंदाजाला माघारी पाठवून दिल्लीची अवस्था ५ बाद २३ धावा अशी दयनीय केली. अमन खानने अर्धशतक झळकावताना गुजरातच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. अक्षर पटेल व रिपल पटेल यांनीही चांगली फटकेबाजी केली. अक्षर ( २७) व अमन यांनी ५० धावांची भागीदारी केली. अमन शड्डू ठोकून उभा राहिला आणि त्याने ४४ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ५१ धावा केल्या. अमन आणि रिपल पटेल ( २३) यांनी २७ चेंडूंत ५३ धावांची भागीदारी केली आणि संघाला ८ बाद १३० धावा उभारून दिल्या. मोहित शर्माने दोन विकेट्स घेतल्या.

प्रत्युत्तरात खलिल अहमदने पहिल्याच षटकात वृद्धीमान साहाला माघाली पाठवून GTला धक्का दिला. एनरिच नॉर्खिया आणि इशांत शर्मा यांनी अनुक्रमे शुबमन गिल ( ६) व विजय शंकर ( ६) यांना बाद केले. पॉवर प्लेमध्ये गुजरातची ताकद गेली. कुलदीप यादवच्या फिरकीवर रिव्हर्स स्वीप मारण्याच्या नादात डेव्हिड मिलर भोपळ्यावर त्रिफळाचीत झाला. गुजरातचे ४ फलंदाज ३२ धावांवर माघारी परतले. कर्णधार हार्दिक पांड्या व अभिनव मनोहर यांनी गुजरातच्या डावाला आकार देताना चांगली भागीदारी केली. पण, दिल्लीच्या गोलंदाजांनी धावगतीवर अंकुश ठेवल्याने यजमानांवर दडपण कायम होते.

३६ चेंडू ६० धावा गुजरातला करायच्या होत्या. हार्दिक व अभिनवने अर्धशतकी भागीदारी पूर्ण करताना सामन्यातील चुरस कायम राखली होती. हार्दिकने सुरेख फटके मारताना मॅच १८ चेंडूंत ३७ धावा अशी जवळ आणली. १८व्या षटकात खलिल अहमदने ही ६३ धावांची भागीदारी संपुष्टात आणताना अभिनवला ( २६) झेलबाद केले. खलिलने त्या षटकात १ विकेट घेतली अन् फक्त ४ धावा दिल्या. त्यामुळे १२ चेंडू ३३ अशी मॅच अटीतटीची आली. नॉर्खियाने पहिल्या तीन चेंडूवर तीन धावा दिल्या अन् त्यानंतर राहुल तेवातियाने सलग तीन षटकार खेचून मॅच फिरवली. गुजरातला अखेरच्या षटकात केवळ १२ धावांची गरज होती. 

इशांत शर्माने अनुभव पणाला लावताना राहुलला ( २०) माघारी पाठवले. सामना १ चेंडू ७ धावा असा आला. हार्दिक ५९ धावांवर नाबाद होता आणि राशीद खान स्ट्राईकवर होता. इशानने १ धाव देत गुजरातला ६ बाद १२५ धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले. दिल्लीने ५ धावांनी मॅच जिंकली. 

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :आयपीएल २०२३इशांत शर्मागुजरात टायटन्सदिल्ली कॅपिटल्स
Open in App