Hardik Pandya Krunal Pandya catch, IPL 2023 GT vs LSG Live: गुजरातच्या संघाने लखनौ सुपर जायंट्स विरूद्धच्या सामन्यात २ बाद २२७ धावांपर्यंत मजल मारली. शुबमन गिलच्या नाबाद ९४ आणि वृद्धिमान साहाच्या ८१ धावांच्या बळावर गुजरातने लखनौला २२८ धावांचे लक्ष्य दिले. गुजरातच्या सलामीवीरांची फलंदाजी चर्चेत राहिलीच. पण त्याबरोबरच चर्चा रंगली ती कृणाल पांड्याने त्याचा भाऊ हार्दिक पांड्याचा टिपलेला कॅचची... हार्दिक फॉर्मात दिसत असतानाच घडलेला हा प्रकार चांगलाच चर्चिला गेला.
कृणालने घेतला हार्दिकचा झेल...
नाणेफेक जिंकून लखनौने गुजरातच्या संघाला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले. गुजरातच्या संघाने सलामीवीर वृद्धिमान साहाच्या २० चेंडूत तडाखेबाज अर्धशतकाच्या बळावर पॉवर प्ले मध्ये ७८ धावा केल्या. त्यानंतर शुबमन गिलने २९ चेंडूत अर्धशतक ठोकले. वृद्धिमान साहा १० चौकार आणि ४ षटकारांच्या साथीने ४३ चेंडूमध्ये ८१ धावा करून बाद झाला. त्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्यानेही फटकेबाजी केली. पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. हार्दिकने १५ चेंडूत १ चौकार २ षटकारांसह २५ धावा केल्या. त्याला मोहसीन खानने एक साधा चेंडू टाकला. हार्दिकने अतिशय जोर काढून चेंडू चौकारासाठी मारलाच होता, पण भावानेच त्याचा घात केला. कृणाल पांड्याच्या हाताला तो चेंडू लागला, तो कळवळला तरीही त्याने झेल न सोडता हार्दिक पांड्याला थेट झेलबाद केले. पाहा व्हिडीओ-
दरम्यान हार्दिक बाद झाल्यानंतर शुबमन गिलने मात्र तुफानी खेळी सुरूच ठेवली. त्याने नाबाद ९४ धावा केल्या. त्याच्या खेळीत २ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश होता. डेव्हिड मिलरने शेवटपर्यंत फलंदाजी करत १२ चेंडूत २१ धावा केल्या.
लखनौच्या गोलंदाजांनी फारशी चमक दाखवता आली नाही. मोहसीन खानने १ आणि आवेश खानने १ बळी टिपला.