Rashid Khan catch, IPL 2023 GT vs LSG Live: राशिद खान ज्या संघात आहे, त्याला नेहमीच तिप्पट फायदा होतो. तो केवळ जगातील आघाडीचा फिरकीपटूच नाही तर खालच्या फळीतील स्फोटक फलंदाजही आहे. या दोन आघाड्यांवर राशिद उत्तम आहे, त्यासोबतच तो क्षेत्ररक्षणातही कोणतीही कसर सोडत नाही. लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध त्याने आपल्या क्षेत्ररक्षणाची अशी चुणूक दाखवली आणि आपल्या दोन चुका सुधारून संघाला मोठे यश मिळवून दिले. गुजरातने अहमदाबादमध्ये लखनौविरुद्ध 227 धावांची मोठी धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात लखनौच्या सलामीवीरांनीही स्फोटक सुरुवात केली होती. या दरम्यान, मेयर्सला बाद करण्याची संधीही चालून आली पण रशीदने दोनदा चूक केली पण नंतर ती चूक सुधारली.
मेयर्सविरुद्ध दोनदा चूक
चौथ्या षटकात कर्णधार हार्दिक पंड्याच्या चेंडूवर मेयर्सने पॉईंटवर झेल दिला पण राशिद खानला हा झेल पकडता आला नाही. रशीदसारख्या क्षेत्ररक्षकाकडून अशी चूक झाल्याचे पाहून हार्दिकलाही आश्चर्य वाटले. त्यानंतर सातव्या षटकात रशीद स्वत: गोलंदाजीला आला तेव्हा मेयर्सविरुद्ध एलबीडब्ल्यूचे अपील झाले, ते पंचांनी फेटाळले. रशीदच्या सांगण्यावरून कर्णधाराने डीआरएस घेतला पण तो निर्णय चुकीचा ठरला आणि मेयर्स पुन्हा वाचला.
राशिदने भन्नाट झेल घेतला
जेव्हा राशिदने झेल सोडला तेव्हा मेयर्स 25 धावांवर होता आणि त्यानंतर त्याने फटकेबाजी केली. अशा स्थितीत गुजरात विकेटच्या शोधात होते. ही संधी 9व्या षटकात निर्माण झाली, जेव्हा मेयर्सने मोहित शर्माच्या शॉर्ट बाउन्सरवर पुल शॉट खेळला. चेंडू हवेत उंचावला आणि डीप स्क्वेअर लेगवरून 26 मीटर अंतरावर धावत आलेल्या राशिदने धावताना आश्चर्यकारक झेल घेतला. रशीदने झेल घेताच उत्साहात आणि जल्लोषात धावायला सुरुवात केली. त्याच्या चेहऱ्यावरही आश्चर्याचे भाव होते. मेयर्सलाही धक्का बसला. गुजरातचे सर्व खेळाडू रशीदच्या दिशेने धावू लागले. मेयर्सचा डाव 48 धावांवर संपुष्टात आला.
दरम्यान, विराट कोहलीही या सामन्यावर लक्ष ठेवून होता. हा झेल पाहिल्यानंतर लगेचच त्याने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो पोस्ट केला आणि राशिद खानचे कौतुक केले आणि लिहिले की हा त्याने पाहिलेल्या सर्वोत्तम झेलांपैकी एक आहे.