Wriddhiman Saha, IPL 2023 GT vs LSG: लखनौ विरूद्धच्या सामन्यात गुजरातच्या संघाने तुफानी सुरूवात केली. पॉवर-प्ले मध्ये असलेल्या फिल्डिंगच्या बंधनाचा उत्तम फायदा करून घेत वृद्धिमान साहाने तुफान फलंदाजी करायला सुरूवात केली. आवेश खान आणि मोहसीन खान या दोन युवा वेगवान गोलंदाजांचा साहाने चांगलाच समाचार घेतला. मोहसीन खानच्या तर एका षटकात त्याने तुफान फटकेबाजी करत २२ धावा कुटल्या. त्यामुळेच ५व्या षटकात वृद्धिमान साहाने अवघ्या २० चेंडूत अर्धशतक ठोकले. त्याने ६ चौकार आणि ४ षटकारांच्या साथीने दमदार फिफ्टी केली.
गुजरात टायटन्ससाठीही महत्त्वाची कामगिरी
गुजरातचे सलामीवीर शुबमन गिल आणि साहा या दोघांनी दमदार सुरूवात करत मोठा पराक्रम केला. या दोघांनी मिळून पॉवर-प्ले च्या पहिल्या सहा षटकांमध्ये तब्बल ७८ धावांची फटकेबाजी केली. दोघांनी मिळून पॉवर-प्ले मध्ये ६ चौकार आणि ६ षटकारांच्या साथीने ७८ धावा केल्या. गुजरातची या स्पर्धेतील ही सर्वाधिक पॉवर प्ले धावसंख्या ठरली.
लखनौ सुपर जायंट्स संघ: कृणाल पांड्या (कर्णधार), क्विंटन डी कॉक, काइल मेयर्स, दीपक हुडा, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, स्वप्नील सिंग, यश ठाकूर, रवी बिश्नोई, मोहसीन खान, आवेश खान
गुजरात टायटन्स संघ: हार्दिक पांड्या (क), रिद्धिमान साहा, शुभमन गिल, विजय शंकर, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी
दरम्यान, आज IPL स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन सख्खे भाऊ कर्णधार म्हणून एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या च्या विरोधात लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार कृणाल पांड्याने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सध्याच्या गुणतालिकेत गुजरातचा संघ १० पैकी ७ सामने जिंकून १४ गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर लखनौचा संघ १० पैकी ५ सामने जिंकून तिसऱ्या स्थानी आहे.