Join us  

अभिनव मनोहर : चप्पल विकणाऱ्याच्या पोरानं आधी गरिबीला अन् काल 'अंबानीं'च्या मुंबई इंडियन्सला हरवलं! 

IPL 2023, GT vs MI : देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्नाटककडून खेळणाऱ्या २८ वर्षीय अभिनव मनोहरने ( Abhinav Manohar)  मंगळवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध २१ चेंडूत ४२ धावांची आक्रमक खेळी खेळली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 4:17 PM

Open in App

IPL 2023, GT vs MI : देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्नाटककडून खेळणाऱ्या २८ वर्षीय अभिनव मनोहरने ( Abhinav Manohar)  मंगळवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध २१ चेंडूत ४२ धावांची आक्रमक खेळी खेळली. त्याने डेव्हिड मिलरसह ७१ धावांची भागीदारी करताना गुजरात टायटन्सला २०७ धावांचा डोंगर उभा करून दिला. शुबमन गिलच्या अर्धशतकानंतर मनोहर व मिलर यांनी 'किलर' फटकेबाजी केली. मिलरने २२ चेंडूंत ४६ धावा चोपल्या, तर राहुल तेवातियाने २ चेंडूंत नाबाद २० धावांची खेळी केली.  

१६ सप्टेंबर १९९४ रोजी कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथे जन्मलेल्या अभिनव मनोहर याने अल्पशा कारकिर्दीत दिग्गजांचे लक्ष वेधून घेतले. अभिनवरचे बालपण संघर्षात गेले. वडील बंगळुरूच्या रस्त्यांवर चपलांचे दुकान चालवायचे. जवळच प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक इरफान सैत यांचे कपड्यांचे दुकान होते. अभिनवच्या वडिलांनी त्यांना मुलालाही क्रिकेटचे प्रशिक्षण देण्याची विनंती केली. इथूनच अभिनव मनोहरच्या क्रिकेटर बनण्याचा प्रवास सुरू झाला. सुरूवातीला अभिनवने क्रिकेटमध्ये फारसा रस दाखवला नाही, पण एका घटनेने त्याचे संपूर्ण आयुष्यच बदलून टाकले.  २००६ मध्ये १४ वर्षांखालील सामन्यात फलंदाजी करताना चेंडू थेट त्याच्या कपाळावर आदळला. जखम खोल असल्याने टाकेही घालावे लागले. दुसऱ्या दिवशी त्याच अवस्थेत त्याने शतक झळकावले आणि इथून मागे वळून पाहिले नाही. अभिनवने १९ डिसेंबर २०२१ रोजी म्हणजेच कोरोनाच्या कालावधीनंतर ट्वेंटी-२० कारकिर्दीला सुरुवात केली. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचा पहिला सामना कर्नाटककडून राजस्थानविरुद्ध खेळला होता. IPL 2022 च्या मेगा लिलावात गुजरात टायटन्सने २.६ कोटी रुपये देऊन अभिनवला त्यांच्या संघात समाविष्ट केले. गेल्या मोसमात त्याला ८ सामन्यांत संधी मिळाली होती, परंतु त्याला फार छाप पाडता आली नाही, मात्र, यंदाच्या मोसमात त्याने ४ सामन्यांत १८२.९८ च्या स्ट्राईक रेटने ८६ धावा केल्या आहेत. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :आयपीएल २०२३गुजरात टायटन्समुंबई इंडियन्स
Open in App