IPL 2023, Gujarat Titans vs Mumbai Indians Live Marathi : गुजरात टायटन्सच्या २०८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सला चार धावेवर पहिला धक्का बसला. मोहम्मद शमी व हार्दिक पांड्या यांनी अप्रतिम गोलंदाजी करून रोहित शर्मा व इशान किशनवर दडपण निर्माण केले होते. हार्दिकने १४५+च्या वेगाने सातत्याने मारा करून रोहितला अचंबित केले अन् त्यामुळेच त्याने चुकीचा फटका मारून त्याची विकेट फेकली.
गुजरात टायटन्सच्या फलंदाजांनी आज चांगली फटकेबाजी केली. अर्जुन तेंडुलकरने तिसऱ्या षटकात वृद्धीमान साहाला माघारी पाठवले अन् त्यानंतर पियुष चावला, कुमार कार्तिकेय यांनी GTला धक्के दिले. पण, शुबमन गिलने ३४ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह ५६ धावा करताना MIला कडवी टक्कर दिली. शुबमनची विकेट पडल्यानंतर अभिमन मनोहर व डेविड मिलर यांन ७१ धावांची दमदार भागीदारी करताना गुजरातला दोनशेपार नेले. अभिनवने २१ चेंडूंत ४२ धावा ( ३ चौकार व ३ षटकार) चोपल्या, तर मिलरने २२ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह ४६ धावा केल्या. राहुल तेवातियाने ५ चेंडूंत ३ षटकारांसह नाबाद २० धावा करून गुजरातला ६ बाद २०७ धावांचा टप्पा गाठून दिला.
गुजरातने पहिल्या १३ षटकांत ४ बाद १०३ धावा केल्या होत्या आणि शेवटच्या ७ षटकांत त्यांनी २ बाद १०४ धावांचा पाऊस पाडला. आयपीएल इतिहासात मुंबईला एकवेळाच २०० पार धावांचा पाठलाग करता आलेला आहे. मोहम्मद शमी व हार्दिक पांड्या यांनी उत्कृष्ट गोलंदाजी करून MIच्या सलामीवीरांना दडपणात ठेवले. हार्दिकने दुसऱ्या षटकात रोहित शर्मा ( २) ला मामू बनवले. हार्दिकचा १४४kmphच्या वेगाने आलेल्या चेंडूवर रोहित क्रॉस फटका मारायला गेला अन् चेंडू जागच्या जागी हवेत उडाला. हार्दिकने सोपा झेल घेत मुंबईला ४ धावांवर पहिला धक्का दिला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"