IPL 2023, Gujarat Titans vs Mumbai Indians Live Marathi : अर्जुन तेंडुलकरने ( Arjun Tendulkar) रोहित शर्माने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला. तिसऱ्याच षटकात त्याने गुजरात टायटन्सचा सलामीवीर वृद्धीमान साहाला बाद केले आणि त्यानंतर पियुष चावला व कुमार कार्तिकेय यांनी फिरकीवर मुंबई इंडियन्सला यश मिळवून दिले. GT साठी शुबमन गिल पुन्हा एकदा अर्धशतकी खेळी करून उभा राहिला. त्यानंतर अभिनव मनोहर आणि डेव्हिड मिलर यांनी ३५ चेंडूंत ७१ धावांची भागीदारी करताना MI समोर तगडे लक्ष्य ठेवले. राहुल तेवातियाने ५ चेंडूंत २० धावा कुटल्या.
मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. अर्जुनने पहिल्या षटकात ४ धावा दिल्या. अर्जुनने त्याच्या दुसऱ्या षटकात साहाची विकेट मिळवून दिली. डावीकडे जाणाऱ्या चेंडूला साहाने छेडलं अन् बॅटची कड लागून तो यष्टिरक्षक इशान किशनच्या हाती विसावला. साहाने DRS घेतला, परंतु तो वाया गेला. शुबमन गिल एका बाजूने चांगली फटकेबाजी करताना दिसला अन् त्याने कॅमेरून ग्रीनच्या ( ६ षटकं) षटकात ४,४,६ अशा धावा केल्या. पॉवर प्लेमध्ये GTच्या १ बाद ५० धावा झाल्या. सातव्या षटकात पियुष चावला गोलंदाजीला आला आणि त्याच्या पहिल्याच चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात हार्दिक ( १३) झेलबाद झाला. सूर्यकुमार यादवने सीमारेषेवर अचूक झेल टिपला.
शुबमन एका बाजूने चांगले फटके मारताना दिसला अन् त्याने ३० चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. GT ने १० षटकांत २ बाद ८४ धावा केल्या. १२व्याष षटकात कुमार कार्तिकेयच्या गोलंदाजीवर आक्रमक फटका मारण्याच्या प्रयत्नात शुबमन झेलबाद झाला. त्याने ३४ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह ५६ धावा केल्या. पियुषने पुन्हा एकदा फ्लायटेड चेंडू टाकला अन् विजय शंकरला फटका मारण्यास भाग पाडले. चेंडू टीम डेव्हिडच्या हातात जाऊन बसला अन् विजयला १९ धावांवर माघारी जावे लागले. कार्तिकेयनं ३९ धावा देत १ विकेट घेतली. अभिनव मनोहरने पियुषच्या चौथ्या षटकात १७ धावा चोपल्या. पियूषने ४ षटकांत ३४ धावा देत २ विकेट्स मिळवल्या.
२०व्या षटकात राहुल तेवातियाने सलग २ चेंडू षटकार खेचून गुजरातची धावसंख्या दोनशेपार नेली. मिलर २२ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह ४६ धावांवर बाद झाला. तेवातिया ५ चेंडूंत ३ षटकारांसह २० धावांवर नाबाद राहिला. गुजरातने ६ बाद २०७ धावा केल्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"