IPL 2023, Gujarat Titans vs Rajasthan Royals Live : राजस्थान रॉयल्सचे यशस्वी जैस्वाल आणि जॉस बटलर हे फॉर्मात असलेले सलामीवीर ४ धावांवर बाद झाले. त्यामुळे ही मॅच गुजरात टायटन्स आरामात जिंकेल, असे वाटले होते. पण, संजू सॅमसन ( Sanju Samson) व शिमरोन हेटमायर यांनी दमदार खेळ करताना मॅचमधील उत्सुकता शिगेला पोहोचवली. संजूने ३ चौकार व ९ षटकारांसह ६० धावा कुटल्या. हेटमायर अखेरच्या षटकापर्यंत खिंड लढवण्याचा प्रयत्न केला. ध्रुव जुरेल व आर अश्विन यांनी अनपेक्षित फटकेबाजी करून RRला मॅच जिंकून दिली. RRचा हा GTवरील पहिलाच विजय ठरला.
नितीश राणा-हृतिक शोकीनला भांडण महागात, BCCIची कारवाई; सूर्यकुमार यादवलाही १२ लाखांचा दंड
RRची सुरूवात काही चांगली झाली नाही. हार्दिकने दुसऱ्या षटकात सलामीवीर यशस्वी जैस्वालची ( १) विकेट घेतली. त्यानंतर पुढील षटकात मोहम्मद शमीने अप्रतिम चेंडूवर जॉस बटलरचा ( ०) त्रिफळा उडवला. देवदत्त पडिक्कल ( २६) व संजू सॅमसन यांनी ४३ धावांची भागीदारी केली. रियान परागचे ( ५) अपयशाचे सत्र सुरूच राहिले. राशीदने GTला दोन महत्त्वाच्या विकेट्स मिळवून दिल्या. १३व्या षटकात संजूने गिअर बदलला... राशीदला त्याने सलग तीन षटकार खेचले अन् त्याची स्पेल बिघडवून टाकली. त्याला शिमरोन हेटमायरची साथ मिळताना दिसली.
संजूने २९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि त्याचे हे यंदाच्या पर्वातील दुसरे अर्धशतक ठरले. पदार्पणवीर नूर अहमदच्या पहिल्याच षटकात संजूने चांगले फटके खेचले अन् याच प्रयत्नात अखेरच्या चेंडूवर तो झेलबाद झाला. संजूने ३२ चेंडूंत ३ चौकार व ६ षटकारांसह ६० धावा कुटल्या. त्याने हेटमायरसह २७ चेंडूंत ५९ धावांची भागीदारी केली. ध्रुव जुरेल नवा फलंदाज मैदानावर आला.
RRला २४ चेंडूंत ४४ धावा करायच्या होत्या. ध्रुवने १९व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर खणखणीत षटकार केचून ११ चेंडूंत १७ धावा अशी मॅच आणली. पण, पुढच्याच चेंडूवर शमीने त्याची ( १७) विकेट काढली. रवी अश्विनने पहिलाच चेंडू अप्रतिम स्क्वेअर कट मारून चौकार खेचला अन् नंतर षटकार खेचून मॅच ८ चेंडू ७ धावा अशी फिरवली. ३ चेंडूंत १० धावा करून अश्विन बाद झाला. हेटमायरने २६ चेंडूंत २ चौकार व ५ षटकारांसह नाबाद ५६ धावा करून RRला विजय मिळवून दिला. RR ने ७ बाद १७९ धावा केल्या.
तत्पूर्वी, ट्रेंट बोल्टने ( Trent Boult) पहिल्याच षटकात वृद्धीमान साहाला बाद केले. साई सुदर्शन ( २०) रन आऊट झाला. शुबमन गिलला ( ४५) कर्णधार हार्दिक पांड्याने ( २८) साथ दिली. अभिनव मनोहर ( २७) व डेव्हिड मिलर ( ४६) यांनी अखेरच्या षटकांत चांगले फटके मारले आणि GT ला ७ बाद १७७ धावांपर्यंत मजल मारून दिली. संदीप शर्माने दोन विकेट्स घेतल्या.
Web Title: IPL 2023, GT vs RR Live : Rajasthan Royals have defeated Gujarat Titans, Sanju Samson & Shimron Hetmyer scored fifty
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.