IPL 2023, Gujarat Titans vs Sunrisers Hyderabad Live Marathi : शुबमन गिलने ( Shubman Gill) आज सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांनी धुलाई करताना ५८ चेंडूंत १३ चौकार व १ षटकार खेचून १०१ धावा केल्या. त्याने साई सुदर्शनसह १४७ धावांची भागीदारी करून गुजरात टायटन्सला चांगली धावसंख्या उभारून दिली. आयपीएल २०२३ मध्ये शतक झळकावणारा तो सहावा फलंदाज ठरला. पण, सुदर्शन बाद झाल्यानंतर GTच्या अन्य फलंदाजांनी पाट्या टाकल्या अन् SRHच्या गोलंदाजांनी कमबॅक केले.
भुवनेश्वर कुमारने पहिल्याच षटकात वृद्धीमान साहाला (० ) स्लीपमध्ये झेल देण्यास भाग पाडले. प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळालेला साई सुदर्शन दोन वेळा रन आऊट होता होता वाचला. शुबमन गिलचा फॉर्म कामय राहिला आणि त्याने यंदाच्या पर्वात ५००+ धावांचा टप्पा ओलांडला. गिलने GTच्या धावांची सरासरी चढी राखताना पॉवर प्लेमध्ये ६५ धावांपर्यंत संघाला पोहोचवले. शुबमन व साई यांची ८४ चेंडूंत १४७ धावांची भागीदारी १५व्या षटकात मार्को यान्सेनने तोडली आणि साई ४७ धावांवर झेलबाद झाला.
हार्दिक पांड्याला ( ८) भुवनेश्वरने बाद केले. नटराजनने पुढील षटकार डेव्हिड मिलरला ( ७) बाद केले. त्यापाठोपाठ फारूकीने ३ धावांवर राहुल तेवातियाला बाद केले. २०व्या षटकात शुबमन ५८ चेंडूंत १३ चौकार व १ षटकार खेचून १०१ धावांवर बाद झाला. भुवनेश्वरने पुढच्या चेंडूवर राशीद खानला (०) माघारी पाठवले आणि हॅटट्रिक चेंडूवर नूर अहमद रन आऊट झाला. भुवनेश्वरने २०व्या षटकात तीन विकेट्स घेतल्या आणि त्याने ४-०-३०-५ अशी स्पेल टाकली. गुजरातला त्यांनी ९ बाद १८८ धावांवर रोखले.