नवी दिल्ली : ‘आयपीएल २०२२’चा चॅम्पियन गुजरात टायटन्स संघ यंदाच्या सत्रात मात्र काढलेल्या धावांचा बचाव करण्यात अपयशी ठरताना दिसतोय. या संघाचे मार्गदर्शक गॅरी कर्स्टन यांनीही ही बाब कबूल केली. शिस्तबद्ध गोलंदाजीअभावी असे घडत असून, संघासाठी हा चिंतेचा विषय असल्याचे कर्स्टन म्हणाले.
गुजरातने पाचपैकी तीन सामने जिंकले तर दोन सामन्यांत त्यांना धावसंख्येचा बचाव करता आलेला नाही. कर्स्टन म्हणाले, ‘मागील सत्रात आम्ही चार सामन्यांत धावांचा यशस्वी बचाव केला तर सहा सामन्यांत लक्ष्याचा पाठलाग करत विजय नोंदविले होते. यंदा मात्र आतापर्यंत धावांचा बचाव करता आलेला नाही, मात्र, ही स्पर्धेची सुरुवात आहे. मागच्या वर्षी आमच्याकडे गोलंदाजीचे आक्रमण भक्कम होते. यंदा काही गोलंदाज जखमी आहेत. याशिवाय ज्या खेळाडूंवर आम्ही महत्त्वाच्या षटकांसाठी विश्वास दाखवितो, ते यासाठी सज्ज असतीलच असे नाही.’
गुजरातला न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनची उणीव जाणवत आहे. त्यांनी लॉकीला केकेआरला सोपविले. कर्स्टन पुढे म्हणाले, ‘प्रत्येक संघाला विविध परिस्थितीत ताळमेळ साधावा लागतो. आमच्याकडे गोलंदाजीत सुधारणेस वाव आहे. ही भूमिका योग्य खेळाडू बजावत आहे, याकडे लक्ष दिले जाईल.’
शुभमन तंत्रशुद्ध फलंदाज शुभमनने गुजरातला आतापर्यंत शानदार सुरुवात करून दिली. त्याने पाच सामन्यांत २२८ धावा केल्या आहेत. गिल हा तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून पुढे आला आहे. भारतीय संघातून सर्वच प्रकारांत त्याची कामगिरी पाहता खात्री पटते. या कौशल्याच्या बळावर जागतिक क्रिकेटमध्ये तो मोठी कामगिरी करू शकतो. - गॅरी कर्स्टन