गतविजेत्या गुजरात टायटन्सने यंदाच्या आयपीएलमध्ये मंगळवारी सलग दुसरा विजय मिळवताना दिल्ली कॅपिटल्सचा ६ गड्यांनी पराभव केला. प्रथम गोलंदाजी करताना गुजरातने दिल्लीला २० षटकांत ८ बाद १६२ धावांत रोखले. हे आव्हान गुजरातने सहज पार करताना १८.१ षटकांत ४ बाद १६३ धावा केल्या. दिल्लीचा हा सलग दुसरा पराभव असून, गुजरातने गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवले.
बी. साई सुदर्शन गुजरातच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने प्रमुख फलंदाज अपयशी ठरल्यानंतर एका बाजूने खंबीरपणे फलंदाजी करताना नाबाद अर्धशतक झळकावले. तसेच या सामन्यात गुजरातचा संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि राशीद खानने प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. मात्र महत्वाच्या क्षणी दिल्लीला दडपणात टाकण्याचे काम अल्झारी जोसेफने केले. अल्झारी जोसेफच्या नवव्या षटकात वॉर्नर आणि रिली रोसौ यांना पाठोपाठच्या चेंडूवर बाद करत दिल्लीला दडपणात आणले.
गुजरात टायटन्सचे प्रशिक्षक गैरी कर्स्टन यांनी देखील अल्झारी जोसेफचे कौतुक केले. दिल्ली विरुद्धचा सामना जिंकल्यानंतर कर्स्टन यांनी गुजरातच्या सर्व खेळाडूंचे कौतुक केले. परंतु कर्स्टन यांनी अल्झारी जोसेफ या सामन्यातील खरा 'इम्पॅक्ट प्लेयर' असल्याचे सांगितले. अल्झारी जोसेफचे नाव ऐकताच गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या खूप आनंदी झाला. यावेळेचा व्हिडिओ गुजरात टायटन्सने सोशल मीडियावर देखील शेअर केला आहे.
दरम्यान, १६२ धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना वृद्धिमान साहा आणि शुभमन गिल यांनी गुजरातला आवश्यक सुरुवातीचा फायदा घेता आला नाही. कर्णधार हार्दिक पांड्याही झटपट बाद झाल्यानंतर गुजरातचा संघ अडचणीत आला. मात्र साई. सुदर्शनने विजय शंकरसह ५३ धावांची, तर यानंतर डेव्हिड मिलरसोबत २९ चेंडूत नाबाद ५६ धावांची भागीदारी केली. मिलरने आपल्या अनुभवाच्या जोरावर सुदर्शनला चांगली साथ देत संघाला विजयी केले.
Web Title: IPL 2023: Gujarat Titans beat Delhi Capitals by 6 wickets for their second straight win.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.