आयपीएलच्या सोळाव्या हंगामाला सुरुवात होऊन दोन आठवडे उलटले तरी अद्याप एकाही फलंदाजाला शतक ठोकता आले नव्हते. मात्र आज कोलकाता नाईटरायडर्सविरुद्धच्या लढतीत हैदराबादचा सलामीर हॅरी ब्रुक याने शतकी खेळी करत यंदाच्या आयपीएलमधील शतकांचा दुष्काळ संपवला आहे. हॅरी ब्रुकने केवळ ५५ चेंडूत आपले शतक पूर्ण केले आहे.
आज कोलकाता नाईटरायडर्सने नाणेफेक जिंकून हैदराबादला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केल्यावर पहिल्या षटकापासूनच हॅरी ब्रुक हा केकेआरच्या गोलंदाजांवर तुटून पडला. त्याने ३२ चेंडूतच आपले अर्धशतक पूर्ण केले होते. दरम्यान, मयांक अग्रवाल आणि राहुल त्रिपाठी झटपट बाद झाले. मात्र ब्रुकने केकेआरच्या गोलंदाजांची धुलाई सुरूच ठेवली.
दरम्यान, ब्रुकने मार्क्रमसोबत ६२ धावांची भागीदारी केली. तर मार्क्रम बाद झाल्यानंतर ब्रुक आणि अभिषेक शर्माने ७२ धावांची भागीदारी करत संघाला दोनशेपार नेले. अखेर शेवटच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर एकेरी धाव घेत ब्रुकने आपलं शतक पूर्ण केलं. ब्रुकने ५५ चेंडूत शंभरीपार मजल मारली. हॅरी ब्रुकने तुफानी खेळी करताना ५५ चेंडूत १२ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने नाबाद १०० धावा कुटल्या.