मुंबई - जगातील सर्वात मोठी टी-२० लीग असलेल्या आयपीएलला अधिक रोमांचक करण्यासाठी नवनवे बदल नेहमी केले जातात. दरम्यान, आयपीएलच्या २०२३ च्या हंगामात इम्पॅक्ट प्लेअरचा नियम लागू केला जाईल. आयपीएलच्या अधिककृत ट्विटर हँडलवर हा नियम पुढच्या हंगामापासून लागू करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली आहे. बीसीसीआयने हल्लीच आटोपलेल्या सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेमध्ये या नियमाची चाचणी करण्यात आली होती. या स्पर्धेत संघाना प्रत्येकी एक सब्सिट्युट खेळाडूला उतरवण्याची परवानगी देण्यात आली होती. त्याला इम्पॅक्ट प्लेअर असं नाव देण्यात आलं होतं.
या नियमानुसार दोन्ही संघांना नाणेफेकीच्या वेळी ११ खेळाडूंसोबत ४ इतर अतिरिक्त खेळाडूंची नावं सांगावी लागतील. चार अतिरिक्त खेळाडूंमधील कुठल्याही एकाचा वापर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून करता येईल. डावाच्या १४ व्या षटकापर्यंतच इम्पॅक्ट प्लेअरला मैदानात पाठवता येईल.
इम्पॅक्ट प्लेअर मैदानात उतरवताना संघाचा कर्णधार, कोच, टीम मॅनेजर यांना त्याची माहिती फिल्ड अम्पायर किंवा फोर्थ अम्पायरला माहिती द्यावी लागेल. इम्पॅक्ट प्लेअर आल्यानंतर जो खेळाडू बाहेर जाईल, त्याला समन्यात पुन्हा खेळता येणार नाही. षटक संपल्यावर, विकेट पडल्यावर आणि खेळाडू जखमी झाल्यावर इम्पॅक्ट प्लेअर मैदानात उतरवता येईल. इम्पॅक्ट प्लेअर डावातील फलंदाजी आणि ४ षटके गोलंदाजी करू शकतो. मात्र कुठल्याही परिस्थितीत केवळ ११ फलंदाजांनाच फलंदाजी करता येईल.
दरम्यान, हृतिक शौकिन हा भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील पहिली इम्पॅक्ट प्लेअर ठरला होता. मुश्ताक अली करंडक स्पर्धेत दिल्ली आणि मणिपूर यांच्यात झालेल्या लढतीत दिल्लीच्या संघाने हृतिक शौकिनला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून उतरवले होते. त्या सामन्यात शौकिनने ३ षटकात १३ धावा देऊन दोन विकेट्स टिपल्या होत्या.