Ishant Sharma, IPL 2023 Delhi Capitals vs Gujarat Titans : इशांत शर्माने अनुभव काय असतो आणि तो काय करू शकतो हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे . भारताच्या सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेल्या इशांतने मंगळवारी IPL 2023 मध्ये गतविजेत्या गुजरात टायटन्सविरोधात दिल्लीला विजय मिळवून दिला. हार्दिक पांड्याचा (Hardik Pandya) गुजरात हा सामना सहज जिंकेल असे वाटत असतानाच इशांतने शेवटच्या षटकात गुजरातला 12 धावा करू न दिल्यामुळे हा संघ पाच धावांनी हरला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी केली पण मोठी धावसंख्या करू शकली नाही. प्रथम फलंदाजी करताना या संघाला आठ गडी गमावून केवळ 130 धावा करता आल्या. खराब सुरुवातीनंतर गुजरातने पुनरागमन केले पण इशांतने त्याला जिंकू दिले नाही आणि संपूर्ण षटक खेळल्यानंतर या संघाला सहा गडी गमावून केवळ 125 धावाच करता आल्या.
इशांतने केली फिनिशर्सची बोलती बंद!
शेवटच्या दोन षटकात गुजरातला विजयासाठी 33 धावांची गरज होती. गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने अर्धशतक झळकावले. मोक्याच्या क्षणी षटकार मारण्यासाठी ओळखला जाणारा तेवातिया काही करू शकला नाही. तेवातियाने एनरिक नोरखियाला १९व्या षटकात तीन षटकार ठोकले होते. त्यामुळेच गुजरातला शेवटच्या षटकात 12 धावांची गरज होती. या धावा वाचवण्याचे काम वॉर्नरने इशांतकडे दिले. इशांतने ही कामगिरी चोख बजावली. त्यांनी तेवतिया आणि पांड्यासारख्या तुफानी फलंदाजांना शांत ठेवले आणि एकही चेंडू मारायला दिला नाही. इशांतने पहिल्या चेंडूवर दोन धावा दिल्या. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर एकच धाव दिली. तिसऱ्या चेंडूवर एकही धाव आली नाही. चौथ्या चेंडूवर इशांतने तेवतियाला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. मग राशिद खान आला. राशिदला लांब षटकार मारता येतात पण इशांतने त्याला नियंत्रणात ठेवले. रशीदने पाचव्या चेंडूवर दोन धावा घेतल्या. आता शेवटच्या चेंडूवर गुजरातला ७ धावांची गरज होती. त्यावेळी इशांतने अनुभवाचा कस लावत राशिदला षटकार ठोकू दिला नाही आणि सामना जिंकवला.
विजय शंकरची केली अप्रतिम शिकार!
तत्पूर्वी, इशांतने आपल्या एका शानदार चेंडूने सर्वांची वाहवा मिळवली. इशांतने गुजरातच्या विजय शंकरला बाद केले. इशांतने शंकरला जो चेंडू टाकला तो पाहण्यासारखा होता. शंकरला बाद करण्यासाठी इशांतने नकल बॉलचा वापर केला. इशांतने चेंडूवरील पकड बदलून चेंडू पुढे टाकला. शंकर हा चेंडू मारायला गेला आणि बोल्ड झाला. या सामन्यात इशांतने चार षटकांत २३ धावा देत दोन विकेट्स घेतल्या.
पाच सामन्यांत संधी मिळाली नाही!
दिल्लीने यंदा पहिल्या पाच सामन्यांमध्ये इशांतला संधी दिली नाही. या मोसमात त्याला कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध पहिला सामना खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने दोन विकेट्स आपल्या नावावर केल्या. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांत प्रत्येकी एक बळी घेण्यात तो यशस्वी ठरला. त्यानंतर त्याला गुजरातविरुद्धही संधी मिळाली आणि त्याने आपल्या संघाला विजय मिळवून दिला.