सलामीवीर यशस्वी जयस्वालने केलेली तुफानी अर्धशतकी खेळी, जोस बटलरच्या ७९ धावा आणि अखेरच्या षटकांमध्ये शिमरॉन हेटमायरने केलेली फटकेबाजी याच्या जोरावर दिल्लीविरुद्धच्या लढतीत राजस्थान रॉयल्सने धावांचा डोंगर उभारला आहे. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने निर्धारीत २० षटकांमध्ये ४ बाद १९९ धावा करत दिल्लीसमोर २०० धावांचं आव्हान ठेवलं आहे.
दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केल्यावर यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलर यांनी राजस्थान रॉयल्सला तुफानी सुरुवात करून. दरम्यान, पहिल्या चेंडूपासून दिल्लीच्या गोलंदाजांवर तुटून पडलेल्या यशस्वी जयस्वालने आपलं अर्धशतक केवळ २५ चेंडूत पूर्ण केलं. दरम्यान, ३१ चेंडूत ६० धावा काढून यशस्वी जयस्वाल मुकेश कुमारची शिकार झाला. जयस्वाल आणि बटररने सलामीसाठी ९८ धावा जोडल्या. जयस्वाल पाठोपाठ कर्णधार संजू सॅमसनही भोपळाही न फोडता कुलदीप यादवची शिकार झाला.
जसस्वाल आणि संजू सॅमसन पाठोपाठ बाद झाल्याने धावगती मंदावली., १४ व्या षटकात राजस्थानचा संघ तीन बाद १२६ धावांपर्यतच पोहोचला होता. पहिल्या ६ षटकात ६८ धावा कुटणाऱ्या राजस्थानला सात ते १४ या आठ षटकांत केवळ ५८ धावाच काढता आल्या. दरम्यान, रियान परागही ७ धावा काढून माघारी परतला. त्याला रोवमन पॉवेलने बाद केले.
पण पराग बाद झाल्यानंतर फलंदाजीस आलेल्या शिमरॉन हेटमायरने तुफानी फटकेबाजी केली. बटलर आणि हेटमायरने राजस्थानची धावगती वाढवली. पण शतकाच्या दिशेने आगेकूच करत असलेला बटलर ७९ धावांवर दुर्दैवीरीत्या मुकेश कुमारची शिकार झाला. मात्र २१ चेंडूत ३९ धावा कुटणारा हेटमायर आणि ३ चेंडूत ८ धावा काढणाऱ्या ध्रुव जोरेल यांनी अखेरच्या ९ चेंडूत २४ धावा झोडपत राजस्थानला ४ बाद १९९ धावांपर्यंत मजल मारून दिली. दिल्लीकडून मुकेश कुमारने २ बळी टिपले.