नवी दिल्ली : टी-२० विश्वचषकानंतर क्रिकेटरसिकांना आता आयपीएल २०२३ च्या मिनी ऑक्शनचे वेध लागले आहेत. २३ डिसेंबर रोजी कोच्ची येथे खेळाडूंचा लिलाव होईल. त्याआधी १५ नोव्हेंबरपर्यंत सर्वच संघांना रिटेन खेळाडू आणि रिलीज खेळाडूंची यादी सोपवायची आहे.
या पार्श्वभूमीवर आयपीएलच्या इतिहासातील सर्वांत यशस्वी संघ असलेल्या मु्ंबई इंडियन्सने आपल्या करारमुक्त खेळाडूंची यादी व्यवस्थापनाकडे सुपूर्द केली असल्याचे एका वृत्तात म्हटले आहे. मुंबईने आपला मॅचविनर फलंदाज किरोन पोलार्डला करारमुक्त करत बाहेरचा रस्ता दाखवला. दुसरीकडे नाराज असल्याच्या कारणांवरून वारंवार चर्चेत राहिलेला अष्टपैलू रवींद्र जडेजा हा मात्र चेन्नई सुपरकिंग्सकडूनच खेळणार हे स्पष्ट झाले.
चेन्नईच्या संघाने चार खेळाडूंना करारमुक्त केले असल्याची माहिती आहे. कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्यासह रवींद्र जडेजा, शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, मुकेश चौधरी, ड्वेन प्रिटोरियस, मोईन अली आणि दीपक चहर या खेळाडूंना संघात कायम ठेवले आहे. तर इंग्लंडचा गोलंदाज ख्रिस जॉर्डन, तामिळनाडूचा फलंदाज एन. जगदीशन, न्यूझीलंडचा स्पिनर मिचेल सँटनर आणि वेगवान गोलंदाज ॲडम मिल्ने या चौघांना करारमुक्त केल्याची माहिती देण्यात आली.
मुंबई इंडियन्सने आपल्या पाच खेळाडूंना करारमुक्त केले. धडाकेबाज फलंदाज किरोन पोलार्डला संघातून करारमुक्त करण्याचा मुंबई इंडियन्सचा निर्णय चाहत्यांसाठी नक्कीच धक्कादायक राहणार आहे.
पोलार्ड २०१० सालच्या हंगामापासून मुंबईसोबत आहे. मुंबईच्या पाचही विजेतेपदामध्ये त्याचा महत्त्वाचा वाटा होता. त्याने आतापर्यंत झालेल्या १३ हंगामात १४७ च्या स्ट्राइक रेटने ३ हजार ४१२ धावा केल्या. मात्र, यंदाच्या आयपीएलमध्ये पोलार्डला ११ सामन्यांत केवळ १४४ धावाच करता आल्या. त्यात त्याचा स्ट्राइक रेटही १०७ होता. त्याच्या याच खराब फॉर्ममुळे संघाने त्याला करारमुक्त करण्याचे ठरविले असावे.
मुंबईने कायम ठेवलेले खेळाडू
रोहित शर्मा, इशान किशन, जोफ्रा आर्चर, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, ट्रिस्टन स्टब्स, डेवाल्ड ब्रेविस, तिलक वर्मा आणि डॅनियल सॅम्स.
करारमुक्त केलेले खेळाडू
किरोन पोलार्ड, टायमल मिल्स, फॅबियन ॲलन, हृतिक शोकीन, मयंक मार्कंडे.
सीएसकेने कायम ठेवलेले खेळाडू
कर्णधार महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, मुकेश चौधरी, ड्वेन प्रिटोरियस, मोईन अली आणि दीपक चहर.
करारमुक्त केलेले खेळाडू
ख्रिस जॉर्डन, एन. जगदीशन, मिचेल सँटनर. ॲडम मिल्ने.
Web Title: IPL 2023: Kieron Pollard 'out' of Mumbai Indians, Jadeja stays with CSK
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.