- अयाज मेमन, कन्सल्टिंग एडिटर
कोलकाता नाइटरायडर्सला (केकेआर) पंजाब किंग्सविरुद्ध सलामी लढतीत पराभवाचे तोंड पाहावे लागले. त्या सामन्यातील चुकांपासून बोध घेत गुरुवारी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरविरुद्ध (आरसीबी) खेळताना त्यांच्यापुढे कामगिरी सुधारण्याचे आव्हान असेल. घरच्या मैदानावर हा सामना होणार असल्याने ईडन गार्डनवर खेळताना केकेआरला चाहत्यांचा मोठा पाठिंबा मिळेल. त्यामुळे केकेआरच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
केकेआरने पंजाबविरुद्ध पहिला सामना सात धावांनी गमावला. दुसरीकडे आरसीबीने मुंबई इंडियन्सला आठ गड्यांनी पराभूत करीत शानदार विजयी सलामी दिली होती. त्या सामन्यात विराट कोहली आणि फाफ डुप्लेसिस या दोघांचीही बॅट तळपली होती. या दोघांना रोखण्यासाठी केकेआरच्या गोलंदाजांना अचूक मारा करावा लागेल. केकेआरच्या गोलंदाजांमध्ये उमेश यादव, टिम साउदी, लॉकी फर्ग्युसन (खेळल्यास), वरुण चक्रवर्ती यांचा समावेश आहे. त्यांच्यापुढे कोहली और डुप्लेसिस या सलामी जोडीला लवकर माघारी धाडण्याची डोकेदुखी असेल, हे अवघड आव्हान ते कसे पेलणार, हे पाहणे रंजक ठरेल.
सामना : केकेआर वि. आरसीबीस्थळ : ईडन गार्डन. वेळ : सायंकाळी ७.३० पासून
या खेळाडूंवर असेल नजर
आरसीबी
- विराट कोहली : फॉर्ममध्ये परतल्यापासून सातत्याने धावा काढत आहे.
- फाफ डुप्लेसिस : सलामीवीर म्हणून विराट कोहलीसोबत उत्कृष्ट ताळमेळ साधतो.
- मोहम्मद सिराज : मुंबईविरुद्ध गोलंदाजीतील पहिल्या स्पेलमध्ये भेदक मारा केला.
केकेआर
- आंद्रे रसेल : धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू.
- सुनील नरेन : उत्कृष्ट फिरकी गोलंदाज. कोणत्याही स्थानावर फलंदाजीत उपयुक्त योगदान देतो.
- नीतिश राणा : कर्णधार या नात्याने रणनीतीसोबतच धावा काढण्याचीही जबाबदारी असेल.