IPL 2023, Kolkata Knight Riders vs Chennai Super Kings Live : चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात ५० लाखांच्या किमतीत दाखल झालेल्या अजिंक्य रहाणेने ( Ajinkya Rahane) कोट्यवधींची कामगिरी केली आहे. मुंबई इंडियन्सविरुद्ध वानखेडेवर महेंद्रसिंग धोनीने ( Ms Dhoni) अजिंक्यला खेळण्याची संधी दिली. त्यानंतर मुंबईच्या फलंदाजाने मागे वळून पाहिलेच नाही. भात्यात असतील-नसतील सर्व फटके त्याने आज मारले. कोलकाताच्या इडन गार्डवर त्याने उमेश यादवला स्क्वेअर लेगला खणखणीत षटकार खेचला... त्यानंतर स्कूप मारून सहा धावा मिळवल्या. पूल, उलटा सुपला, कव्हर ड्राईव्ह... असे क्रिकेटच्या सर्व फॉर्मातील फटके आज अजिंक्यने मारले. त्याने २९ चेंडूंत ६ चौकार व ५ षटकारांचा पाऊस पाडताना नाबाद ७१ धावा चोपल्या.
ऋतुराज गायकवाड ( ३५) आणि डेव्हॉन कॉनवे ( ५६) यांनी ७३ धावांची मजबूत भागीदारी रचली. अजिंक्य रहाणे व शिवम दुबे या मुंबईकरांची बॅट चांगलीच तळपली. या दोघांनी KKRच्या गोलंदाजांना धू धू धुतले. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ३२ चेंडूंत ८५ धावांची भागीदारी केली. इडन गार्डनवर MS Dhoni व CSKचेच समर्थक अधिक दिसली. इडन गार्डनवर पिवळी चादर पसरलेली दिसली अन् अधुनमधून KKRचा जांभळ्या जर्सीचे ठिपके दिसत होते. अजिंक्यने २४ चेंडूंत,तर शिवमने २० चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. शिवम २१ चेंडूंत २ चौकार व ५ षटकारांसह ५० धावांवर बाद झाला.
रवींद्र जडेजाने ८ चेंडूंत १८ धावा चोपल्या. दोन चेंडूंसाठी महेंद्रसिंग धोनी मैदानावर आला अन् स्टेडियमवर धोनी... धोनी... नावाचा जयघोष सुरू झाला. धोनीचे फटके कॅमेरात कैद करण्यासाठी प्रेक्षकांनी मोबाईल बाहेर काढले. अजिंक्य २९ चेंडूंत ६ चौकार व ५ षटकारांसह ७१ धावांवर नाबाद राहिला. चेन्नईने ४ बाद २३५ धावा केल्या. यंदाच्या आयपीएलमधील ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. इडन गार्डनवरीलही ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. CSKच्या इनिंग्जमध्ये आज १८ षटकार व १४ चौकारांचा पाऊस पडला.
KKRचे दोन फलंदाज १ धावेवर माघारी परतले. सुनील नरीण व एन जगदीशन यांना अनुक्रमे आकाश सिंग व तुषार देशपांडेने माघारी पाठवले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"