rinku singh ipl 2023 । अहमदाबाद : आयपीएलच्या १६ व्या हंगामातील १३ वा सामना गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (GT vs KKR) यांच्यात खेळवला गेला. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने बाजी मारली. लक्षणीय बाब म्हणजे अखेरच्या षटकात केकेआरला विजयासाठी २९ धावांची गरज होती. अशातच रिंकू सिंगने यश दयालच्या गोलंदाजीवर सलग ५ षटकार ठोकून गुजरातला पराभवाची धूळ चारली. गुजरातने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ४ बाद २०४ केल्या होत्या.
दरम्यान, गुजरातकडून साई सुदर्शन (५३) आणि विजय शंकरने २४ चेंडूत नाबाद ६३ धावांची खेळी केली. गुजरातने दिलेल्या २०५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरची खराब सुरूवात झाली. सलामीवीर दोघेही स्वस्तात माघारी परतले. पण व्यंकटेश अय्यरने ४० चेंडूत ८० धावा करून विजयाकडे कूच केली. अशातच अल्झारी जोसेफने व्यंकटेश अय्यर (८०) आणि कर्णधार नितीश राणाला (४५) बाद करून यजमान संघाच्या चाहत्यांना जागे केले. त्यानंतर टायटन्सचा कर्णधार राशिद खानने हॅटट्रिक घेऊन जवळपास विजय निश्चित केला.
अखेरच्या षटकात मोठा ट्विस्ट
अखेरच्या षटकांत केकेआरला विजयासाठी २९ धावांची गरज होती. रिंकू सिंगने स्फोटक खेळी करून सामन्याचा निकाल बदलला. यश दयालच्या गोलंदाजीवर सलग ५ षटकार ठोकून केकेआरने सलग दुसरा विजय नोंदवला. रिंकूने ६ षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने २१ चेंडूत ४८ धावांची नाबाद खेळी केली. अखेर केकेआरने २० षटकांत ७ बाद २०७ धावा करून गुजरात टायटन्सचा विजयरथ रोखला. सलग पाच चेंडूवर षटकार मारल्याने गुजरातचा गोलंदाज यश दयालला अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.
खरं तर गुजरातच्या संघाचे नेतृत्व आज राशिद खानकडे होते. नियमित कर्णधार हार्दिक पांड्याची तब्येत ठिक नसल्यामुळे त्याला विश्रांती देण्यात आली असून पांड्याच्या जागी विजय शंकरला संधी मिळाली. राशिद खानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार पांड्याची तब्येत ठिक नसल्यामुळे त्याला विश्रांती देण्याचा निर्णय संघ व्यवस्थापनाने घेतला असल्याचे राशिद खानने म्हटले. आजचा सामना नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे गुजरात टायटन्सच्या घरच्या मैदानावर खेळवला गेला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: IPL 2023 KKR vs GT Match Kolkata Knight Riders Rinku Singh hits 5 consecutive sixes while bowler Yash Dayal is moved to tears
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.