IPL 2023, Kolkata Knight Riders vs Punjab Kings Live : पंजाब किंग्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये शनिवारी झालेल्या सामन्यात सांघिक कामगिरीवर यश मिळवले. भानुका राजपक्षा आणि कर्णधार शिखर धवनने दमदार फलंदाजी करून मोठी धावसंख्या उभी केली. त्यानंतर अर्शदीप सिंगने पुन्हा एकदा गोलंदाजीत कमाल करून दाखवली. त्याला अन्य गोलंदाजांकडूनही चांगली साथ मिळाली. आंद्रे रसेलने पंजाबच्या गोटात चिंता निर्माण केली होती, परंतु पाऊस त्यांच्यासाठी धावून आला.
स्टेडियमवरील लाईट्स बंद पडल्यामुळे दुसरा डाव थोडा उशीरा सुरू झाला. रहमनुल्लाह गुरबाजने पहिल्या षटकात खणखणीत षटकार खेचला. पण, अर्शदीप सिंगने त्याच्या पहिल्याच षटकात मनदीप सिंग ( २) आणि अनुकूल रॉय ( ४) यांना बाद केले. वेंकटेश अय्यर इम्पॅक्ट खेळाडू म्हणून मैदानावर आला आणि त्याने चांगला खेळ केला. नॅथन एलिसने गुरबाजचा ( २२) त्रिफळा उडवला. कर्णधार नितीश राणा आणि वेंकटेश यांनी ४६ धावांची भागीदारी करताना कोलकाताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु सिकंदर रझाने विकेट मिळवली. राणा २४ धावांवर बाद झाला.
आंद्रे रसेल फटकेबाजीच्या निर्धारानेच मैदानावर उतरला अन् २० धावांवर त्याचा झेल प्रभसिमरनने टाकला. सॅम करनने KKRला मोठा धक्का देताना १९ चेंडूंत ३५ धावा कुटणाऱ्या रसेलला बाद केले. पण, त्यानंतर आलेल्या शार्दूल ठाकूरने पहिल्याच चेंडूवर षटकार खेचला. KKRला ३० चेंडूंत ५६ धावा करायच्या होत्या अन् ४ विकेट्स हातात होत्या. अर्शदीपने पुन्हा कमाल करताना वेंकटेश अय्यरला ( ३४) बाद करून पंजाबचा विजय जवळपास पक्का केला. सुनील नरीन व शार्दूल यांच्याकडून KKRच्या चाहत्यांना अपेक्षा होत्या. १६व्या षटकानंतर पावसामुळे खेळ थांबवला गेला आणि DLS नियमानुसार KKR ७ धावांनी पिछाडीवर होते. कोलकाताच्या ७ बाद १४६ धावा झाल्या होत्या. पंजाब किंग्सने DLS नुसार हा सामना जिंकला.
तत्पूर्वी, भानुका राजपक्षाचे अर्धशतक अन् शिखर धवनची संयमी खेळी वगळल्यास पंजाबचे अन्य फलंदाज फार कमाल दाखवू शकले नाहीत. राजपक्षाने KKR च्या गोलंदाजांची धुलाई करताना ३२ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ५० धावा केल्या आणि धवनसोबत ( ४०) त्याने ५५ चेंडूंत ८६ धावांची भागीदारी केली. जितेश शर्माने झटपट धावांचा सपाटा लावला आणि ११ चेंडूंत २१ धावा चोपल्या. सॅम करन व सिकंदर रझा ( १६) ही जोडी पंजाबला दोनशेपार नेईल असे वाटत असताना सुनील नरीनने झिम्बाब्वेच्या खेळाडूला बाद केले. पंजाब किंग्सने २० षटकांत ५ बाद १९१ धावा केल्या. करन १७ चेंडूंत २६ धावांवर, शाहरूख ११ धावांवर नाबाद राहिला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"