Join us  

IPL 2023, KKR Vs RCB: आरसीबीच्या गोलंदाजांना रहमतुल्ला गुरबाझ नडला, एकट्यानेच भिडला, ठोकलं घणाघाती अर्धशतक

IPL 2023, KKR Vs RCB Live Updates: एकीकडे बंगळुरूच्या भेदक माऱ्यासमोर कोलकाताच्या आघाडीच्या फलंदाजांना टिकून खेळणेही कठीण झालेले असताना रहमतुल्ला गुरबाझ एकट्यानेच खिंड लढवताना दिसला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2023 8:30 PM

Open in App

बंगळुरूविरुद्ध घरच्या मैदानावर खेळत असलेल्या कोलकाता नाईटरायडर्सची अवस्था बिकट झालेली आहे. ५० धावा पूर्ण होण्याआधीच त्यांचे ३ खंदे फलंदाज माघारी परतले आहेत. एकीकडे बंगळुरूच्या भेदक माऱ्यासमोर कोलकाताच्या आघाडीच्या फलंदाजांना टिकून खेळणेही कठीण झालेले असताना रहमतुल्ला गुरबाझ एकट्यानेच खिंड लढवताना दिसला. इतर फलंदाजांना एकेका धावेसाठी झगडत असताना गुरबाझने, चौकार षटकारांची आतशबाजी करत अर्धशतक पूर्ण केलं. 

सावध सुरुवात केल्यानंतर कोलकात्याला व्यंकटेश अय्यर आणि मनदीप सिंग यांच्या रूपात दोन धक्के बसले होते. मात्र रहमतुल्ला गुरबाझने एक बाजू लावून धरताना आरसीबीच्या गोलंदाजांवर प्रतिहल्ला केला. त्याने ३८ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. यादरम्यान, त्याने ३ षटकार आणि ६ चौकार खेचले. त्याच्या अर्धशतकी खेळीमुळे कोलकात्याला १० षटकांत ३ बाद ७९ धावांपर्यंत मजल मारता आली. 

या खेळीदरम्यान, गुरबाझ नशिबवानही ठरला. शाहबाझ अहमदच्या गोलंदाजीवर त्याला मैदानावरील पंचांनी बाद ठरवले होते. मात्र डीआरएस घेतल्यानंतर त्यात हा चेंडू गुरबाझच्या ग्लव्हजना स्पर्शून गेल्याचे दिसले होते. मात्र १२ व्या षटकात करण शर्माला रिव्हस्र स्विप करण्याचा त्याचा प्रयत्न फसला आणि तो झेलबाद झाला. मात्र तोपर्यंत त्याने ५७ धावांची खेळी केली. 

दरम्यान,  चौथ्या षटकात रिज टोप्लीच्या जागी खेळत असलेल्या डेव्हिड विलीने षटकातील दुसऱ्या चेंडूवर केकेआरच्या सलामीवीरांचा बचाव भेदताना व्यंकटेश अय्यरचा त्रिफळा उडवला. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर विलीने मनदीप सिंगचीही दांडी गुल केली. आता विली हॅटट्रिक करणार असं वाटत असतानाच चौथा चेंडू खेळून काढत केकेआरचा कर्णधार नितीश राणाने विलीची हॅटट्रिक हुकवली. मात्र विलीने या संपूर्ण षटकात एकही धाव न देता केकेआरवर दबाव वाढवला. त्यानंतर मायकेल ब्रेसवेलने सातव्या षटकात कोलकाता नाईटरायडर्सचा कर्णधार नितीश राणाला बाद करत कोलकात्याची अवस्था ३ बाद ४७ अशी केली आहे. 

टॅग्स :आयपीएल २०२३कोलकाता नाईट रायडर्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
Open in App