कोलकाता नाईटरायडर्सने दिलेल्या २०५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा डाव अडचणीत सापडला आहे. विराट कोहली, फाफ डू प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल आणि हर्षल पटेल अशा आघाडीच्या चार फलंदाजांची दांडी गुल करत कोलकात्याने सामन्यावर वर्चस्व मिळवलं आहे. सुनील नारायणने विराट कोहली आणि शाहबाझ अहमद तर वरुण चक्रवर्तीने फाफ डू प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल आणि हर्षल पटेलला माघारी धाडले.
२०५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विराट कोहलीने पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकत आपले इरादे स्पष्ट केले होते. मात्र पहिल्या तीन षटकांमध्ये विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस यांनी सावध फलंदाजी केली. मात्र साऊथीने टाकलेल्या चौथ्या षटकात विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिसने २३ धावा कुटून काढल्या. त्यानंतर नितीश राणाने गोलंदाजीत बदल करत सुनील नारायणला पाचवे षटक टाकण्यासाठी पाचारण केले. त्याने विराट कोहलीचा (२१) त्रिफळा उडवत बंगळुरूला पहिला धक्का दिला. त्यानंतर वरुण चक्रवर्तीने फाफ डु प्लेसिसचा (२३) त्रिफळा उडवत आरसीबीला दुसरा धक्का दिला. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेल (५० आणि हर्षल पटेल (०) यांना बाद करत चक्रवर्तीने बंगळुरूला अडचणीत आणले. तर सुनील नारायणने आपला दुसरा बळी टिपताना शाहबाझ अहमदला माघारी धाडत बंगळुरूला पाचवा धक्का दिला.
तत्पूर्वी, अडखळती सुरुवात आणि डावाच्या मध्यावर ५ बाद ८९ अशी अवस्था झाली असताना शार्दुल ठाकूर आणि रिंकू सिंह यांनी केलेल्या तुफानी शतकी भागीदारीच्या जोरावर कोलकाता नाईटरायडर्सने प्रथम फलंदाजी करताना धावांचा डोंगर उभारला आहे. कोलताना नाईटरायडर्सने २० षटकांमध्ये ७ बाद २०४ धावा फटकावून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसमोर २०५ धावांचे आव्हान ठेवले होते. बंगळुरूकडून विली आणि करण शर्मा यांनी प्रत्येकी २ तर सिराज, ब्रेसवेल आण हर्षल पटेल यांनी प्रत्येकी एका फलंदाजाला बाद केले.