Join us  

IPL 2023, KKR Vs RCB: फिरकीपटूंनी RCBच्या फलंदाजांना नाचवले, KKRने विजयाचे खाते उघडले, बंगळुरूचा दारुण पराभव

IPL 2023, KKR Vs RCB Live Updates: आयपीएलमध्ये आज कोलकाता नाईटरायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात झालेल्या लढतीमध्ये आरसीबीला दारुण पराभवाचा सामना करावा लागला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2023 11:14 PM

Open in App

आयपीएलमध्ये आज कोलकाता नाईटरायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात झालेल्या लढतीमध्ये आरसीबीला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. कोलकाता नाईटरायडर्सने दिलेल्या २०५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीचा डाव १२३ धावांवरच आटोपला. वरुण चक्रवर्ती, सुनील नारायण आणि सुयश शर्मा हे फिरकी गोलंदाज बंगळुरूच्या फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरले.  कोलकात्याने हा सामना ८१ धावांनी जिंकला. 

कोलकाता नाईटरायडर्सने दिलेल्या २०५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विराट कोहलीने पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकला. त्यानंतर मात्र पहिल्या तीन षटकांमध्ये विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस यांनी सावध फलंदाजी केली.  साऊथीने टाकलेल्या चौथ्या षटकात विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिसने २३ धावा कुटून काढल्या. त्यामुळे बंगळुरूचा संघा आव्हानाचा जोरदार पाठलाग करेल, असं वाटत होतं. 

मात्र त्यानंतर नितीश राणाने गोलंदाजीत बदल करत सुनील नारायणला पाचवे षटक टाकण्यासाठी पाचारण केले. त्याने  विराट कोहलीचा (२१) त्रिफळा उडवत बंगळुरूला पहिला धक्का दिला. त्यानंतर वरुण चक्रवर्तीने फाफ डु प्लेसिसचा (२३) त्रिफळा उडवत आरसीबीला दुसरा धक्का दिला. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेल (५० आणि हर्षल पटेल (०) यांना बाद करत चक्रवर्तीने बंगळुरूला अडचणीत आणले. तर सुनील नारायणने आपला दुसरा बळी टिपताना शाहबाझ अहमदला माघारी धाडत बंगळुरूला पाचवा धक्का दिला.

त्यानंतरही बंगळुरूची घसरगुंडी कायम राहिली. फलंदाजीत चमक दाखवलेल्या शार्दुल ठाकूरने मायकेल ब्रेसवेलला (१९) बाद केले. त्यानंतर पहिलाच सामना खेळत असलेल्या सुयश शर्माने अनुज रावत (१), दिनेश कार्तिक (९) आणि करण शर्मा (१) यांना माघारी घाडले. अखेरीस वरुण चक्रवर्तीने आकाश दीपचा झेल स्वत:च्याच गोलंदाजीवर टिपत कोलकात्याच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. कोलकात्याकडून वरुण चक्रवर्तीने ४, सुयश शर्माने ३, सुनील नारायणने २ आणि शार्दुल ठाकूरने १ बळी टिपला.  

टॅग्स :आयपीएल २०२३कोलकाता नाईट रायडर्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
Open in App