आयपीएलमध्ये आज होणाऱ्या लढतीत कोलकाता नाईटरायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरू आमने-सामने येणार आहेत. २०१९ नंतर पहिल्यांदाच केकेआरचा संघ घरच्या मैदानावर खेळण्यासाठी उतरणार आहे. पहिल्या सामन्यात केकेआरला पंजाबकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे या सामन्यात विजय मिळवून गुणतालिकेत खातं उघडण्याचं आव्हान केकेआरसमोर असेल. दरम्यान, या सामन्यात केकेआरचा विस्फोटक फलंदाज आरसीबीसाठी डोकेदुखी ठरू शकतो.
या खेळाडूचं नाव आहे आंद्रे रसेल. रसेल आरसीबीच्या संघाविरुद्ध सातत्याने जबरदस्त खेळ करत आला आहे. त्याने बंगळुरूविरुद्ध खेळलेल्या १३ सामन्यांमध्ये २०८ च्या धडाकेबाज स्ट्राइक रेटसह ३९५ धावा कुटल्या आहेत. त्याबरोबरच गोलंदाजीतही चमक दाखवताना १० विकेट्सही टिपले आहेत. ५ एप्रिल २०१९ विरुद्ध आरसीबीविरुद्ध झालेल्या सामन्यात रसेलने तुफानी खेळी केली होती. त्या सामन्यात बंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना २०५ धावा कुटल्या होत्या. विराट कोहली आणि एबी डीव्हिलियर्स यांनी फटकेबाजी केली होती. दरम्यान, शेवटच्या १८ चेंडूंमध्ये कोलकात्याला ५३ धावांची गरज असताना रसेल २ चेंडूत एका धावेवर खेळत होता.
त्यानंतर रसेलचे वादळ मैदानात घोंघावले. त्याने १८ व्या षटकात मोहम्मद सिराजला ३ षटकार ठोकत २३ धावा कुटल्या. त्यानंतर १९ व्या षटकात टीम साऊथीची धुलाई करताना ४ षटकारांसह २९ धावा वसूल केल्या होत्या. रसेलने त्या सामन्यात १३ चेंडूत ४८ धावा कुटत सामन्याचं चित्र पालटवलं होतं. त्याच हंगामात झालेल्या परतीच्या सामन्यात रसेलने २५ चेंडूत ६५ धावांची खेळी केली होती. मात्र तो सामना केकेआरचा संघ १० धावांनी हरला होता.