चार वर्षांनंतर घरच्या मैदानात पहिला सामना खेळत असलेल्या कोलकाता नाईटरायडर्सला बंगळुरूविरुद्ध चांगली सुरुवात करता आली नाही. बंगळुरूने नाणेफेक जिंकत कोलकात्याला प्रथम फलंदाजीसाठी बोलावल्यावर चौथ्याच षटकात डेव्हिड विलीने केकेआरला जबर धक्के दिले. विलीने डावातील चौथ्या षटकात व्यंकटेश अय्यर (३) आणि मनदीप सिंग (०) यांची पाठोपाठच्या चेंडूवर दांडी गुल करत इडन गार्डनवर खळबळ उडवली. मात्र त्यानंतरचा चेंडू खेळून काढत नितीश राणाने विलीची हॅटट्रिक हुकवली.
प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या केकेआरने सावध सुरुवात केली होती. मात्र चौथ्या षटकात रिज टोप्लीच्या जागी खेळत असलेल्या डेव्हिड विलीने षटकातील दुसऱ्या चेंडूवर केकेआरच्या सलामीवीरांचा बचाव भेदताना व्यंकटेश अय्यरचा त्रिफळा उडवला. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर विलीने मनदीप सिंगचीही दांडी गुल केली. आता विली हॅटट्रिक करणार असं वाटत असतानाच चौथा चेंडू खेळून काढत केकेआरचा कर्णधार नितीश राणाने विलीची हॅटट्रिक हुकवली. मात्र विलीने या संपूर्ण षटकात एकही धाव न देता केकेआरवर दबाव वाढवला. त्यानंतर मायकेल ब्रेसवेलने सातव्या षटकात कोलकाता नाईटरायडर्सचा कर्णधार नितीश राणाला बाद करत कोलकात्याची अवस्था ३ बाद ४७ अशी केली आहे.
दरम्यान, या सामन्यात बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघांनी आपल्या आधीच्या लढतीत खेळलेल्या संघामध्ये प्रत्येकी एक बदल केला आहे. सामन्याच्या दुसऱ्या डावात मैदानात दव पडण्याची शक्यता असल्याने बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकताच प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बंगळुरूच्या संघात एक बदल करण्यात आला असून, रिज टोप्लीच्या जागी डेव्हिड विली याला संघात स्थान देण्यात आले आहे. तर कोलकाता नाईटरायडर्सनेही आपल्या संघात एक बदल केला असून, अनुकूल सिंहच्या जागी लेगस्पिनर सुयश शर्मा याला संघात स्थान दिले आहे. सुशय शर्माचा हा आयपीएळमधील पहिलाच सामना असेल. दरम्यान, सामन्याच्या उत्तरार्धात मैदानावर पडणारा दव निर्णायक ठरू शकतो, असे कोलकात्याचा कर्णधार नितीश राणा याने सांगितले.