कोलकाता नाईटरायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सुरू असलेला सामना रंगतदार स्थितीत पोहोचला आहे. हैदराबादने दिलेल्या २२९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सुरुवातीच्या धक्क्यांनंतर कर्णधार नितीश राणा याने संघाला सामन्यात कमबॅक करून दिले आहे. दरम्यान, आपल्या भेदक वेगासाठी प्रसिद्ध असलेला हैदराबादचा गोलंदाज उमरान मलिक याच्या वेगातील हवा नितीश राणाने काढली. डावातील सहाव्या षटकात उमरान मलिकच्या प्रत्येक चेंडूला सीमापार धाडत राणाने तब्बल २८ धावा वसूल केल्या.
भुवनेश्वर कुमार आणि मार्को यान्सेनच्या भेदक माऱ्यासमोर कोलकाता नाईटरायडर्सची अवस्था ३ बाद २० अशी झाली होती. मात्र या स्थितीत कर्णधार नितीश राणा आणि जगदिशन यांनी हैदराबादच्या गोलंदाजांवर जोरदार प्रतिहलल्ला चढवला, नितीश राणाने उमरान मलिकने टाकलेल्या सहाव्या षटकात २८ धावा कुटून काढल्या.
या षटकातील पहिल्या चेंडूवर नितीश राणाने चौकार ठोकला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर खणखणीत षटकार टोकत नितीश राणाने उमरान मलिकची लय बिघडवली. त्यानंतर पुढच्या तीन चेंडूंवर नितीश राणाने वेगवेगळ्या दिशांना तीन चौकार ठोकले. अखेर या षटकाचा जोरदार शेवट करताना नितीश राणाने एक उत्तुंग षटकार ठोकला.