मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याने यंदाच्या आयपीएलमधून टी-२० लीग क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. मुंबई इंडियन्सकडून खेळताना अर्जुनने आपल्या कामगिरीच्या जोरावर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दरम्यान, अर्जुनला क्रिकेटचे काही धडे देणारे माजी क्रिकेटपटू योगराज सिंग यांनी त्याच्याबाबत एक महत्त्वपूर्ण विधान केलं आहे.
योगराज सिंग म्हणाले की, माझ्यामते अर्जुन तेंडुलकरने तिसऱ्या क्रमांकावर खेळलं पाहिजे. जर तो वरच्या फळीत खेळला आणि टी-२० मध्ये त्याने सलामीला येऊन फलंदाजी केली, तर जग त्याला लक्षात ठेवेले. अर्जुनला सध्या कसं मॅनेज केलं जातं, हे मला माहिती नाही. मात्र माझ्या मते तो फलंदाज-गोलंदाज असलेला अष्टपैलू खेळाडू आहे.
माझी व्यवस्थापनाला विनंती आहे की, तुम्ही लोक समजूतदार आहात. एक मुलगा इथे आला. १२ दिवस राहिला. तुम्हाला माहिती असलं पाहिजे की, तो अष्टपैलू आहे, असेही ते म्हणाले. अर्जुन तेंडुलकरने यंदाच्या आयपीएलमध्ये ४ सामने खेळले आहेत. त्यात त्याने ३ विकेट्स टिपले आहेत. तसेच ९.५ षटकांमध्ये ९२ धावा दिल्या आहेत. अर्जुनने आयपीएलमध्ये पंजाब किंग्सविरोधात प्रथमच फलंदाजी केली होती. त्यात त्याने एका उत्तुंग षटकारासह १३ धावा फटकावल्या होत्या.
मात्र पंजाब किंग्सविरुद्धचा सामना अर्जुनसाठी निराशाजनक ठरला होता. त्या सामन्यात पंजाबच्या फलंदाजांनी अर्जुनने टाकलेल्या एका षटकात तब्बल ३१ धावा कटल्या होत्या. मात्र गुजरात टायटन्सविरुद्ध जोरदार पुनरागमन करताना अर्जुन तेंडुलकरने २ षटकांमध्ये ९ धावा देत एक बळी टिपला होता. अर्जुन तेंडुलकरने १६ एप्रिल रोजी कोलकाता नाईटरायडर्सविरुद्ध झालेल्या सामन्यातून पदार्पण केले होते. त्या सामन्यात त्याच्या दोन षटकांमध्ये १७ धावा फटकावल्या गेल्या होत्या. मात्र त्याला बळी मिळाला नव्हता.