लखनौ : आयपीएलच्या दोन नव्या संघांनी मागच्या सत्रात धडाकेबाज कामगिरी केली. यंदा मात्र त्यांच्या कामगिरीत सातत्य जाणवत नाही. शनिवारी घरच्या मैदानावर विजयासह गुणतालिकेत अव्वल स्थान गाठण्याचा लखनौ सुपर जायंट्सचा विचार असावा. दुसरीकडे, राजस्थानकडून तीन गड्यांनी पराभव पत्करणाऱ्या गत चॅम्पियन गुजरातला भरकटलेली गाडी रुळावर आणायची आहे.
स्थळ : इकाना स्टेडियम, वेळ : दुपारी ३:३० पासून
लखनौ सुपर जायंट्स कर्णधार लोकेश राहुल, अष्टपैलू दीपक हुड्डा यांच्याकडून अविस्मरणीय खेळी अपेक्षित. काइल मेयर्स, निकोलस पूरन, मार्कस स्टोयनिस गोलंदाजांची लय बिघडवू शकतात. रवी बिश्नोई, अमित मिश्रा, कृणाल पांड्या, मार्क वुड, आवेश खान, युद्धवीर सिंह, नवीन-उल हक गोलंदाजीत उपयुक्त.
गुजरात टायटन्स लक्ष्याचा बचाव करण्यात संघ अपयशी. कर्णधार हार्दिक गोलंदाजीत प्रभाव टाकू शकला नाही. मोहित शर्मा, मोहम्मद शमी, अल्झारी जोसेफ, जोश लिटिल हे संधीचे सोने करण्यात तरबेज. राशीद खान प्रभावी. शुभमन गिल, डेव्हिड मिलर, साई सुदर्शन यांची मोठी खेळी फरक स्पष्ट करेल.