IPL 2023, Lucknow Super Giants vs Mumbai Indians Live Marathi : मार्कस स्टॉयनिस आणि कृणाल पांड्या यांनी लखनौ सुपर जायंट्सचा डाव सावरला. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी LSGच्या आघाडीच्या तीन फलंदाजांना झटपट माघारी पाठवले होते, परंतु स्टॉयनिस व पांड्या जोडी खेळपट्टीवर शड्डू ठोकून उभी राहिली आणि ८२ धावांची भागीदारी करून मॅच फिरवली. ४९ धावांवर असताना पांड्या रिटायर्ड हर्ट झाला अन् निकोलस पूरनला अखेरच्या चार षटकांत मोठी धावसंख्या उभी करण्याची संधी दिली. स्टॉयनिस व पूरन यांनी पांड्याचा हा डाव यशस्वी ठरवताना MIसमोर तगडे लक्ष्य ठेवले.
मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दीपक हुडा व क्विंट न डी कॉक ही जोडी सलामीला आली. हुडाचा फॉर्म हा LSG साठी डोकेदुखी ठरला आहे. तिसऱ्या षटकात जेसन बेहरनडॉर्फने सलग दोन चेंडूंवर हुडा ( ५) आणि प्रेरक मंकड (०) यांना बाद केले. क्विंटन व कृणाल पांड्या यांनी LSGच्या डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. पण, पियूष चावलाने ७व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर क्विंटनला ( १६) बाद केले. अप्रतिम वळणारा चेंडू क्विंटनच्या बॅटची कड घेत यष्टिरक्षकाच्या हाती विसावला. बाद होण्यापूर्वी क्विंटनने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ९ हजार धावांचा टप्पा ओलांडला.
मार्कस स्टॉयनिस व कर्णधार कृणाल या जोडीने चौथ्या विकेटसाठी ३५ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी करून LSGची गाडी रुळावर आणली. स्टॉयनिसने चांगले उत्तुंग फटके खेचून MI च्या गोलंदाजांवर दडपण निर्माण केले. पियूषपाठोपाठ बेहरेनडॉर्फला डेंजर एरियात पाऊल टाकल्याने वॉर्निंग देण्यात आली. १४ षटकानंतर LSGच्या १०० धावा पूर्ण झाल्या. पण, मुंबईच्या गोलंदाजांनी या दोघांना एकेरी-दुहेरी धावांवरपूरते मर्यादित ठेवले होते. ५ षटकानंतर स्टॉयनिसने चेंडू सीमापार पाठवला. स्टॉयनिससोबत ५९ चेंडूंत ८२ धावांची भागीदारी केल्यानंतर कृणाल रिटायर्ट हर्ट झाला... त्याच्या पायाला दुखापत झाल्याचे पाहायला मिळाले. पांड्याने ४२ चेंडूंत ४९ धावा केल्या.
आयपीएलच्या अन्य महत्त्वाच्या बातम्या
मृत्यूने कवटाळण्यापूर्वी, मला...: MS Dhoni ने साईन केलेली जर्सी दाखवताना सुनील गावस्कर भावूक
मुंबई इंडियन्सचा पियूष चावला 'लेका'साठी हिरो ठरला, पाहा काय किस्सा घडला
पियूष चावलावर अम्पायर भडकले; Live मॅचमध्ये खडसावले अन् रोहित...
निकोलस पूरन आणि स्टॉयनिस यांच्यावर शेवटच्या चार षटकांत मोठे फटके मारून धावसंख्या वाढवण्याचे आव्हान होते. स्टॉयनिसने षटकार खेचून ३६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. ख्रिस जॉर्डनने टाकलेल्या १८व्या षटकात स्टॉयनिसने ६,०,४,४,६,४ अशा धावा चोपल्या आणि २४ धावांसह हे या मॅचमधील महागडे षटक ठरले. जॉर्डनच्या ४ षटकांत ५० धावा आल्या. बेहरेनडॉर्फने मात्र टिच्चून मारा करताना ४-०-३०-२ असा स्पेल टाकला. त्याच्याही अखेरच्या षटकात १५ धावा स्टॉयनिसने चोपल्या. लखनौने २० षटकांत ३ बाद १७७ धावा केल्या. स्टॉयनिस ४७ चेंडूंत ४ चौकार व ८ षटकारांसह ८९ धावांवर नाबाद राहिला आणि पूरनसोबत ( ८ ) त्याने ६० धावा जोडल्या.