IPL 2023, Lucknow Super Giants vs Mumbai Indians Live Marathi :रोहित शर्मा व इशान किशन यांनी मुंबईला आक्रमक सुरूवात करून दिली. पण, दोघंही बाद झाले अन् भवशाचा सूर्यकुमार यादवही अपयशी ठरला.
लखनौचे ३ फलंदाज ३५ धावांवर माघारी पाठवून मुंबई इंडियन्सने सामन्यावर पकड घेतली. पण, मार्कस स्टॉयनिस आणि कृणाल पांड्या यांनी चौथ्या विकेटसाठी ५९ चेंडूंत ८२ धावांची भागीदारी केली. पांड्या ४२ चेंडूंत ४९ धावांवर रिटायर्ड हर्ट झाला. अखेरच्या षटकात निकोलस पूरन व स्टॉयनिस यांनी धावसंख्या वाढवली. ख्रिस जॉर्डनने टाकलेल्या १८व्या षटकात स्टॉयनिसने ६,०,४,४,६,४ अशा धावा चोपल्या आणि २४ धावांसह हे या मॅचमधील महागडे षटक ठरले. या दोघांनी २४ चेंडूंत ६० धावा जोडल्या. लखनौने २० षटकांत ३ बाद १७७ धावा केल्या. स्टॉयनिस ४७ चेंडूंत ४ चौकार व ८ षटकारांसह ८९ धावांवर नाबाद राहिला.
रोहित शर्मा व इशान किशन यांनी मुंबईला आक्रमक सुरूवात करून देताना पॉवर प्लेमध्ये ५८ धावा चोपल्या. या दोघांच्या फटकेबाजीने LSGचे टेंशन वाढवले होते. रिटायर्ड हर्ट होऊन माघारी परतललेला कृणाल गोलंदाजीसाठी मैदानावर आला. तरीही त्याला १०च्या सरीसरीने सुरू असलेल्या मुंबईच्या धावसंख्येवर लगाम लावता आली नाही. रोहितने आजच्या सामन्यात ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ४७५ षटकारांचा टप्पा ओलांडला अन् असा पराक्रम करणारा तो पहिला आशियाई फलंदाज आहे. रवी बिश्नोईने १०व्या षटकात ९० धावांची भागीदारी तोडली. रोहित २५ चेंडूंत १ चौकार व ३ षटकारांसह ३७ धावांवर झेलबाद झाला. इशानने ३४ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले.
बिश्नोईने पुढच्या षटकात इशान किशनची विकेट मिळवून दिली. इशान ३९ चेंडूंत ८ चौकार व १ षटकार खेचून ५९ धावांवर झेलबाद झाला. मुंबईची सर्व भीस्त आता सूर्यकुमार यादववर होती आणि त्याचाच खेळ पाहण्यासाठी चाहते स्टेडियमवर आले होते. पण, यश ठाकूरच्या गोलंदाजीवर सुपला मारण्याचा प्रयत्न फसला अन् ७ धावांवर त्याचा दांडा उडाला. सूर्या मैदानावर तसाच बसून राहिला अन् मुंबईचे चाहते सदस्यात गेले. मुंबईने १५ षटकांत ३ बाद १२५ धावा केल्या आणि त्यांना शेवटच्या पाच षटकांत ५३ धावा करायच्या होत्या.