Deepak Hooda Catch, IPL 2023 Video: सध्या जगभरात IPLची क्रेझ पाहायला मिळत आहे. चाहते आपापल्या फ्रँचायझींना जोरदार पाठिंबा देत आहेत. त्याच वेळी, सर्व संघ आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. आयपीएलमध्ये दररोज अटीतटीच्या लढती पाहाण्याची संधी चाहत्यांना मिळत आहे. त्यामुळे या लीगची मजा द्विगुणित होत आहे. बुधवारी राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना पाहायला मिळाला. दोन्ही संघांमध्ये रंजक सामना पाहायला मिळाला. या सामन्यात LSG आणि टीम इंडियाचा दिग्गज अष्टपैलू दीपक हुडा देखील त्याच्या अप्रतिम झेलमुळे चर्चेत आला.
दीपक हुडाने टिपला अप्रतिम झेल
राजस्थान रॉयल्सला शेवटच्या षटकात विजयासाठी 19 धावांची गरज होती. अशा परिस्थितीत लखनौ सुपर जायंट्सकडून वेगवान गोलंदाज आवेश खान हे महत्त्वाचे षटक टाकत होता. आवेशच्या षटकातील चौथ्या चेंडूवर ध्रुव जुरेल स्ट्राइकवर होता. तो सध्या चांगल्या लयीत आहे. ज्युरेलने मिड-विकेट आणि मिड-ऑनच्या दिशेने आवेशच्या चेंडूवर हवाई फटका मारला. चेंडू चांगलाच लांब आणि उंच गेला, पण सीमा ओलांडण्यासाठी पुरेसा ठरला नाही. अशा स्थितीत सीमारेषेवर असलेल्या दीपक हुडाने सामना दबावाच्या स्थितीत असतानाही झेप घेत अप्रतिम झेल टिपला. त्याने तोल सांभाळत एक झेल घेतला आणि संपूर्ण सामनाच फिरला. दीपकच्या या झेलने लखनौला RR विरुद्ध १० धावांनी विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशा परिस्थितीत लखनौ सुपर जायंट्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 गडी गमावून 154 धावा केल्या. कर्णधार केएल राहुल (39) आणि निकोलस पूरन (29) यांच्यासह काइल मेयर्स (51) यांनीही चांगली खेळी केली. प्रत्युत्तरात 155 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानला 6 विकेट्सवर 144 धावाच करता आल्या आणि 10 धावांनी सामना गमवावा लागला.