आयपीएलचे यंदाचे पर्व कमालीचे रोमांचक ठरत आहे. स्पर्धेतील अनेक सामने हे शेवटच्या षटकापर्यंत रंगत आहेत. त्यामुळे क्रिकेटप्रेमींना रोमहर्षक सामन्यांचा थरार अनुभवता येत आहे. दरम्यान, आयपीएलच्या मैदानातून एक मोठी बातमी समोर येत आहे. आयपीएल २०२३ मध्ये ४ मे रोजी लखनौ सुपरजायंट्स आणि चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात होणाऱ्या सामन्याच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला आहे. हा सामना लखनौमधील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजयेपी, इकाना क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.
लखनौ सुपरजायंट्स आणि चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात होणारा हा सामना यंदाच्या आयपीएलमधील ४६ वा सामना असेल. हा सामना ४ मे रोजी दुपारी साडेतीन वाजता खेळवण्यात येणार होता. मात्र त्याच दिवशी लखनौमध्ये पालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. अशा परिस्थितीत हा सामना आता ४ मे ऐवजी ३ मे रोजी खेळवला जाणार आहे. आतापर्यंत याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र बीसीसीआयने अनौपचारिकपणे संघांना याबाबतची कल्पना दिली आहे.
मंडळातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लखनौ महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी ४ मे रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. लखनौ सुपरजायंट्स आणि सीएसके यांच्यादरम्यान सामना दुपारी ३.३० वाजता होणार आहे. मात्र हा सामना आता ३ मे रोजी याच वेळेत खेळवला जाणार आहे. सामन्यामुळे मतदानाची टक्केवारी कमी होऊ शकते त्यमुळे ही बाब विचारात घेऊन सामन्याचा दिवस बदलण्यात आला आहे.