IPL 2023, Mumbai Indians vs Chennai Super Kings : महेंद्रसिंग धोनीने दिलेल्या संधीचं अजिंक्य रहाणेनं ( Ajinkya Rahane) सोनं केलं. मुंबई इंडियन्सविरुद्ध धोनीने चेन्नई सुपर किंग्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये अजिंक्यला खेळवण्याचा डाव यशस्वी ठरला. वानखेडेच्या खेळपट्टीवर आयुष्य घालवलेल्या अजिंक्यने MI च्या गोलंदाजांना बेक्कार कुटले. फॉर्मात असलेल्या ऋतुराज गायकवाड एका बाजून ही नेत्रदिपक खेळी डोळ्यात साठवताना दिसला. त्यानंतर आणखी एक मुंबईकर शिवम दुबे चांगला खेळला. मुंबईच्याच तुषार देशपांडेने गोलंदाजीत MI ला धक्के दिले होते. आज CSK ने मुंबई इंडियन्सविरुद्ध 'मुंबई'कर अशी यशस्वी रणनीती राबवली.
जेसन बेहरेनडॉर्फने तिसऱ्या चेंडूवर डेव्हॉन कॉनवे ( ०) याचा त्रिफळा उडवला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अजिंक्य रहाणेने घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्सविरुद्ध हल्लाबोल केला. त्याच्या फटक्यांमध्ये नजाकत होती, कोणतात आताताईपणा नव्हता. अर्शद खानने ( Arshad Khan) टाकलेल्या चौथ्या षटकात अजिंक्यने ६,४,४,४,४,४,१असा २३ धावा कुटल्या. अजिंक्यने १९ चेंडूंत ५२ धावा करताना आयपीएल २०२३ मधील सर्वात वेगवान अर्धशतक नोंदवले. त्याने जोस बटलरचा २० ( वि. सनरायझर्स) विक्रम मोडला. अजिंक्यने २७ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ६१ धावांची वादळी खेळी केली. पीयुष चावलाने त्याची विकेट घेतली. ( अजिंक्यची ६१ धावांची वादळी खेळी, पाहा Video )
अजिंक्यने सेट केलेला टेम्पो ऋतुराज व मुंबईकर शिवम दुबेने कायम राखला. इम्पॅक्ट खेळाडू म्हणून तरी अर्जुन तेंडुलकरला संधी मिळेल असे वाटत असताना रोहितने फिरकीपटू कुमार कार्तिकेयाला मैदानावर आणले. त्याने त्याच्या तिसऱ्या षटकात CSKला धक्का दिला. ऋतुराज व शिवम ( २८) यांची ४३ धावांची भागीदारी त्याने तोडली. अंबाती रायुडू व ऋतुराजने चेन्नईला ७ विकेट्स राखून मॅच जिंकून दिली. ऋतुराज ४०, तर रायुडू २० धावांवर नाबाद राहिले. चेन्नईने १८.१ षटकांत ३ बाद १५९ धावा केल्या.
तत्पूर्वी, रोहित (२१) व इशान ( ३२) यांच्या विकेटनंतर यजमानांची गाडी 'लोकल'सारखी घसरली. सूर्यकुमार यादव ( १), कॅमेरून ग्रीन( १२) आणि अर्शद खान ( १) अपयशी ठरले. तिलक वर्मा अन् टीम डेव्हिड यांनी काहीकाळ संघर्ष केला. रवींद्र जडेजाने १८ चेंडूंत २२ धावा करणाऱ्या तिलकला मागे पाठवले. जडेजाने २० धावांत ३ विकेट्स घेतल्या. सँटनरनेही २८ धावांत २ बळी टिपले. टीम डेव्हिड २२ चेंडूंत ३१ धावा करून माघारी परतला. मुंबई इंडियन्सने ८ बाद १५७ धावा केल्या. तुषार देशपांडेनेही ३१ धावांत २ बळी टिपले. ( MS Dhoni चा धीनी रिव्ह्यू सिस्टम पाहिलात का? )
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: IPL 2023, MI vs CSK : Ajinkya Rahane scored 61 in just 27 balls, Chennai Super Kings beat Mumbai Indians by 7 wickets,Mumbai players doing well against Mumbai Indians today
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.