IPL 2023, Mumbai Indians vs Chennai Super Kings : एल क्लासिको सामन्याची सुरुवात दणक्यातच झाली... इशान किशन आणि रोहित शर्मा ( Rohit Sharma) या दोघांनी वादळी फटकेबाजी करताना चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजांना धूतले. तुषार देशपांडे MS Dhoni च्या मदतीला धावला अन् त्याने हिटमॅनचा दांडा उडवला. त्यानंतर मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांनी रांग लावली अन् निम्मा संघ ७६ धावांत तंबूत परतला.
Video : दमदार सुरूवात, पण रोहित शर्मा बाद; नोंदवला MI कडून कुणालाच न जमलेला विक्रम
चेन्नई सुपर किंग्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आजच्या सामन्यात जोफ्रा आर्चर, बेन स्टोक्स व मोईन अली हे तगडे खेळाडू नसल्याने चाहते निराश झाले. पण, रोहित व इशान यांनी जी सुरुवात केली त्याने वानखेडेवर नादखुळा जल्लोष सुरू झाला. रोहित व इशानने चार षटकांत ३८ धावांची भागीदारी केली. तुषार देशपांडेने चौथ्या षटकात रोहितचा ( २१) त्रिफळा उडवला. रोहितने १३ चेंडूंत ३ चौकार व १ षटकार खेचले. त्याच्या या खेळीने त्याने मुंबई इंडियन्सकडून ५००० धावा पूर्ण केल्या आणि MI कडून हा टप्पा ओलांडणारा तो पहिला खेळाडू ठरला.
रोहितनंतर इशान किशन ( ३२ ) व सूर्यकुमार यादव ( १) यांना अनुक्रमे रवींद्र जडेजा व मिचेल सँटनर यांनी बाद केले. सूर्यकुमार यादवकडून फार अपेक्षा होत्या, परंतु सँटनरने त्याला बाद केले. डाव्या बाजूने जाणारा चेंडूला दिशा देण्यासाठी सूर्याने स्वीप मारला, पण त्याच्या बॅटला घासून तो MS Dhoniच्या हातात गेला. अम्पायरने Wide देताच धोनीने DRS घेतला अन् त्यात सूर्या बाद असल्याचे स्पष्ट झाले.
त्यानंतर कॅमेरून ग्रीनचा ( १२) अप्रतिम झेल जडेजाने स्वतःच्याच गोलंदाजीवर घेतला. अर्शद खानही ( १) सँटनरच्या गोलंदाजीवर LBW झाला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"